कातळशिल्पांभोवती बंदिस्त भिंत
By Admin | Updated: July 13, 2016 00:47 IST2016-07-12T21:53:59+5:302016-07-13T00:47:29+5:30
कातळशिल्पांचे जतन झाल्यास पर्यटकांचा ओढाही वाढू शकतो.

कातळशिल्पांभोवती बंदिस्त भिंत
राजापूर : तालुक्यात आढळून आलेल्या कातळशिल्पांचे संरक्षण व्हावे, यासाठी आता शासन सरसावले आहे. एकूण पाच ठिकाणच्या कातळशिल्पांभोवती स्टीलचे बंदिस्त संरक्षक भिंत घातली जाणार असून, त्यासाठी साधारणपणे पन्नास हजाराच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. तालुक्यातील सापडलेल्या कातळशिल्पांचे संरक्षण झाल्यास भविष्यात पर्यटनात्मकदृष्ट्या राजापूर तालुक्याला फायदा होणार आहे.भालावली, देवीहसोळ, वाडापेठ, साखर, गोवळ या ठिकाणी अनेक कातळशिल्प आहेत. त्याचा शोध यापूर्वीच लागला आहे. त्यांच्या जतनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यापूर्वी अनेक कातळशिल्प ही चिरा उत्खननाच्या कामात तुटली गेली. आणखी काही कातळशिल्प चिऱ्याच्या खाणींच्या आजुबाजुला असल्याने त्यांचा बचाव करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने पुढाकार घेतला असून, तालुक्यातील पाच गावांतील कातळशिल्पांचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याभोवती स्टीलचे बंदिस्त कंपाऊंड घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे ही कातळशिल्प संरक्षित होतीलच, शिवाय तालुक्यात येणाऱ्या पर्यटकानाही ती पाहता येतील. कातळशिल्पांचे जतन झाल्यास पर्यटकांचा ओढाही वाढू शकतो. (प्रतिनिधी)