ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा
By Admin | Updated: December 3, 2015 23:49 IST2015-12-03T23:08:01+5:302015-12-03T23:49:11+5:30
गुहागर तालुका : सर्वसामान्यांसाठी आबलोली आरोग्य केंद्राच्या दर्जा वाढीची गरज

ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा
आबलोली : गुहागर तालुक्याची वाढणारी लोकसंख्या आणि झपाट्याने होणारा विस्तार यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तालुक्यात असणाऱ्या एकमेव ग्रामीण रुग्णालयावर पडणारा ताण पाहता अन्य एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणे गरजेचे बनले आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी यामुळे पुढे येत आहे.कोकणातील सर्वसामान्य जनता आरोग्य सेवेकरिता आजही शासकीय रुग्णालयांवर विसंबून आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषत: गुहागर तालुक्यात (सागरी किनारपट्टीवरील तालुका) अस्तित्त्वात असलेले ग्रामीण रुग्णालय (गुहागर), पाच प्राथमिक आरोग्य केंद्र (कोळवली, आबलोली, हेदवी, तळवली, चिखली) व त्याअंतर्गत येणाऱ्या ३० उपकेंद्रांचा विचार करता आरोग्य व्यवस्थेवर नेहमीच कामाचा ताण येतो. त्यातच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत आहे. तालुक्याच्या दक्षिण भागात जास्त प्रमाणात गावे आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेताची आर्थिक परिस्थिती असलेले अल्पभूधारक शेतकरी, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारा कामगारवर्ग, मजूर यांसारखी सर्वसामान्य जनता येथे मोठ्या प्रमाणावर आहे. ही जनता आरोग्य सेवेसाठी प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येत असते. मात्र, या भागाचा विचार करता हेदवी व कोळवली ही आरोग्य केंद्र वाहतुकीच्या दृष्टीने तेवढी सोयीची नसल्याने बरेचसे रुग्ण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आबलोली येथील आरोग्य केंद्राकडे येतात.सध्या आबलोली येथील आरोग्य केंद्रात दैनंदिन बाह्यरुग्ण सरासरी शंभरपेक्षा जास्त असतात. काहीवेळा ही संख्या दीड-दोनशेपर्यंतसुद्धा जाते. तसेच सर्पदंश, विंचूदंश, अपघात व अत्यावश्यक सेवा आवश्यक असणारे रुग्णसुद्धा याच आरोग्य केंद्रात येतात. सर्व रुग्णांना या केंद्रामार्फत रुग्णसेवा दिली जाते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी या भागामध्ये ग्रामीण रुग्णालय असणे ही जनतेची खूप वर्षापासूनची मागणी आहे.
ग्रामीण रुग्णालयातून दिल्या जाणारे उपचार व आंतररुग्ण सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. एक्स-रे, रक्त, लघवी तपासणीसह अन्य तपासण्या व उपचार यासाठी कामथे, डेरवण किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. या ठिकाणी जाणे हे अत्यंत खर्चिक व रुग्णांना गैरसोयीचे आहे. प्रवास, निवास व इतर खर्च यामुळे जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड बसतो.
आबलोली येथे ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी अत्यंत प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. यापूर्वी विद्यमान आमदार व तत्कालीन मंत्री भास्कर जाधव यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी तालुक्यातील गुहागर येथे एक ग्रामीण रुग्णालय असल्याने व नवीन ग्रामीण रुग्णालयाचा अनुशेष शिल्लक नसल्याने आबलोली येथे ग्रामीण रुग्णालय करता येणार नसल्याचे शासनाने कळवले होते. यावर विशेष बाब म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यानंतर ही प्रक्रिया थंडावली असून, आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)
कार्यवाहीची अपेक्षा : कोकणातीलच नेते
सध्या युतीचे शासन आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच पालकमंत्री रवींद्र वायकर हे दोघेही कोकणातीलच असल्याने त्यांना येथील जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. त्यादृष्टीने आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांनी आबलोली येथे ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष प्रयत्न करावेत. सामान्य जनतेच्या सोयीसाठी आबलोली येथे ग्रामीण रुग्णालय होण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत आणि त्याची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी परिसरातील जनतेतून केली जात आहे
एकच रूग्णालय
गुहागर तालुक्यात सद्यस्थितीत एकच ग्रामीण रूग्णालय आहे. तालुक्याचा विचार करता एका रूग्णालयावर खूपच ताण पडत आहे.