संगमेश्वर बसस्थानकातील स्वच्छतागृहाची प्रतीक्षा संपणार
By Admin | Updated: November 5, 2014 23:36 IST2014-11-05T22:48:01+5:302014-11-05T23:36:11+5:30
प्रवाशांना दिलासा : कित्येक वर्षांची मागणी येणार फळाला

संगमेश्वर बसस्थानकातील स्वच्छतागृहाची प्रतीक्षा संपणार
देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण आणि रत्नागिरीच्या मध्यवर्ती असणाऱ्या संगमेश्वर बसस्थानकाला असलेली सुलभ स्वच्छतागृहाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. आमदार उदय सामंत यांच्या निधीतून संगमेश्वर बसस्थानकावरील स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ग्रामीण भागात असणारी बसस्थानके अत्यंत दुर्दैवी स्थितीत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आणि माखजनप्रमाणेच मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण आणि रत्नागिरीच्या मध्यवर्ती असलेले संगमेश्वर बसस्थानकही अशाच सुविधांपासून वंचित राहिले आहे. साखरपा आणि माखजन बसस्थानकांच्या तुलनेत बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संगमेश्वर बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हाती घेतले.
यामध्ये गटारांची बांधणी, कंपाऊंड वॉल, काँक्रीटीकरण, रंगरंगोटीचा समावेश होता. या सर्व कामांच्या शुभारंभप्रसंगी येथील सुलभ स्वच्छतागृहाच्या उभारणीसाठी १० लाख रुपये मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात बसस्थानकाच्या नूतनीकरणाची अन्य कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, सुलभ स्वच्छतागृह उभारण्याचे काम मागे राहिल्याबद्दल महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
संगमेश्वर एस. टी. स्थानक महामार्गावरचे मध्यवर्ती आणि महत्त्वाचे आहे. गोवा, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली, बेळगाव, अक्कलकोट, चिपळूण, कराड, मुंबई, पुणे, ठाणे, बोरिवली अशा लांब पल्ल्याच्या गाड्या येथून मार्गस्थ होत असतात. दिवसाकाठी हजारो प्रवाशांची या बसस्थनकात वर्दळ असताना प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था मात्र प्रशासनाच्या लक्षात येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकात असणारे सध्याचे प्रसाधनगृह अपुरे आणि अस्वच्छ असून, महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. येथील स्वच्छतागृहाचे सर्व पाणी थेट सोनवी नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित करण्याचे कामही या प्रसाधनगृहातून होत आहे. आधीच अपुरे असलेले हे स्वच्छतागृह अद्ययावत करण्याची मागणी होत होती.
संगमेश्वर - रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी या स्वच्छतागृहासाठी १० लाखांचा निधी मंजूर करून या कामात पुढाकार घेतला आहे. येथील स्वच्छतागृहाची फुटलेली टाकी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच स्वच्छतागृहाचे कामही सुरू केले जाणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या शेकडो प्रवाशांसह चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय थोड्याच दिवसात दूर होणार आहे. (प्रतिनिधी)
चिपळूण आणि रत्नागिरीच्या मध्यवर्ती असलेले संगमेश्वर बसस्थानकही अशाच सुविधांपासून लांब.
साखरपा आणि माखजन बसस्थानकांच्या तुलनेत बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संगमेश्वर बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतले हाती.
१० लाखांचा निधी मंजूर.