आता प्रतीक्षा अवघ्या काही तासांचीच!
By Admin | Updated: October 19, 2014 00:30 IST2014-10-19T00:26:10+5:302014-10-19T00:30:25+5:30
मतमोजणी आज : धडधड वाढते ठोक्यात... अशीच उमेदवारांची अवस्था

आता प्रतीक्षा अवघ्या काही तासांचीच!
रत्नागिरी : अनेक निवडणुका एकत्र लढून आता एकमेकांसमोर उभे राहिलेले चार प्रमुख पक्ष, आयत्यावेळी झालेले निर्णय, प्रचाराला मिळालेला कमी कालावधी आणि आयत्या क्षणी झालेली पक्षांतरे यामुळे गाजलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (रविवारी) होत आहे. आतापर्यंत एकत्र फिरणारेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होत असून, बारा ते एक वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे. अनेकांचे राजकीय अस्तित्त्व ठरवणार निकाल काही तासांवर येऊन ठेपल्याने ‘धडधड वाढते ठोक्यात...’ अशी उमेदवारांची अवस्था झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघांमध्ये ४४ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यात सर्वात चुरशीची निवडणूक होत आहे ती रत्नागिरी विधानसभा मतदार संघात केवळ याच मतदार संघात. आतापर्यंतच्या बहुतांश निवडणुका काँग्रेस विरूद्ध भाजप, राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशा झाल्या आहेत. यावेळी मात्र या मतदार संघात शिवसेना विरूद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. येथे उदय सामंत यांनी केलेले पक्षांतर आणि नरेंद्र मोदी यांची सभा या दोन गोष्टी गाजल्या. एरवी एकमेकांसोबत लढणारे कार्यकर्ते यावेळी एकमेकांविरूद्ध लढल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
सर्वाधिक औत्स्युक्याची निवडणूक होणार आहे ती चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात. येथे शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवार सर्वार्थाने तुल्यबळ असल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे औत्स्युक्य आहे.
गुहागर-खेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. शिवसेनेचे विजय भोसले यांना किती मते मिळतात, यावर नातूंचे भवितव्य अवलंबून असल्याने गुहागर मतदार संघही चर्चेचा झाला आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे राजन साळवी आणि काँग्रेसचे राजन देसाई यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. भाजपचे उमेदवार संजय यादवराव किती मते मिळवतात, यावर राजन साळवी यांच्या विजयाची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष यादवराव यांच्या मतांकडे लागले आहे.
जिल्ह्यात केवळ दापोली मतदार संघातच बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांनी अधिकृत उमेदवार संजय कदम यांच्याविरोधात बंड केले आहे. या मतदार संघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांच्यामध्ये मुख्य लढत होत असली तरी मनसेचे वैभव खेडेकर आणि भाजपचे केदार साठे यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नसल्याने या निकालाबाबतही औत्स्युक्य आहे. (प्रतिनिधी)