वहाळ ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: July 22, 2015 23:58 IST2015-07-22T22:15:48+5:302015-07-22T23:58:43+5:30
गावातील ११ वाड्यांतील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची स्वच्छता व पाणी पातळी वाढ करण्याचे नियोजित काम पूर्ण करण्यात आले

वहाळ ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान
चिपळूण : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे ३ लाखाचे बक्षीस वहाळ गावाला मिळाल्याने सोमवारी ग्रामपंचायतीत पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी सभापती समीक्षा बागवे, माजी सभापती सुरेश खापले, गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केसू भोसले उपस्थित होते. सरपंच संजय शेलार, उपसरपंच स्मिता घोरपडे, तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष आनंदा सकपाळ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्त समिती अध्यक्ष सकपाळ यांनी केले. यावेळी त्यांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केल्यामुळे समाधान व्यक्त केले. या ग्रामसभेत निवड करण्यात आलेल्या गाव तंटामुक्त करण्यासाठी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या १४ व्यक्तींचा शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. वर्षभरात व्यसनमुक्त झालेल्या १४ जणांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. गत दोन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या ३ महिला बचत गटांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. मे महिन्यात गावातील ११ वाड्यांतील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची स्वच्छता व पाणी पातळी वाढ करण्याचे नियोजित काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक वस्तीसाठी ५ हजारांचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी सखाराम भुवड, सरपंच शेलार, माजी उपसभापती सदानंद काटदरे, गटविकास अधिकारी भोसले, माजी सभापती खापले, सभापती बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)