आकर्षक वचननाम्यात मतदारांना गाजर?
By Admin | Updated: October 30, 2015 23:40 IST2015-10-30T22:13:02+5:302015-10-30T23:40:09+5:30
रत्नागिरी पोटनिवडणूक : प्रचाराच्या मैदानात गद्दारीचा वार, वचननाम्यात विकासकामांचा भार! -रणसंग्राम

आकर्षक वचननाम्यात मतदारांना गाजर?
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागासाठी १ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठीचा जाहीर प्रचार आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजता संपला आहे. प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांचे प्रबोधन व मनोरंजनही झाले आहे. मात्र, सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत विजयासाठी मतदारांसमोर जाताना जे वचननामे प्रसिध्द केले आहेत; त्यामध्ये विकासकामांचे गाजर मतदारांना दाखवण्यात आले आहे. निवडणुकीनंतर आश्वासनांची ही गाजरे कोण मोडून खाणार व वचनांना कोण जागणार, या भूलभुलय्यामध्ये मतदार आहेत.
रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग २ व प्रभाग चारमधील प्रत्येकी दोन, तर एकूण चार जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव आदी नेत्यांनी हजेरी लावली, तर शिवसेनेचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रचारसभेत विरोधकांवर टोलेबाजी केली. प्रत्येक पक्षाने त्यांच्या वचननाम्यात त्या प्रभागातील कोणती विकासकामे करणार, त्याबाबचे स्पष्टीकरण दिले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीला केवळ वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारांना खरोखरच त्यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करता येणार आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच पालिकेवर भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचे वर्चस्व आहे.
त्यामुळे पोटनिवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी मयेकर यांच्या पदाला धोका नाही. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामे होण्यासाठी भाजप नगराध्यक्षांशीच जुळवून घ्यावे लागणार आहे. सेना, राष्ट्रवादी, भाजप व मनसेनेही वचननामे मतदारांच्या हाती दिले आहेत. (प्रतिनिधी)
प्रचाराची सांगता : सेना-राष्ट्रवादीत चुरस
रत्नागिरी पालिकेच्या चार जागांसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीतील जाहीर प्रचाराची आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजता सांगता झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. शेलक्या विशेषणांनी संबोधित करण्यात आले. या निवडणुकीत सेना, राष्ट्रवादी यांच्यातच खरी चुरस असल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीकडून परिवर्तनाची हाक...
आली परिवर्तनाची लाट, विकासाची धरू आता कास, असा नारा देणारा वचननामा रत्नागिरी पालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांसमोर जाताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सादर केला आहे. या वचननाम्यात शहरातील विकासकामांवर भर देण्यात आला आहे. उमेश शेट्ये यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात झालेल्या विकासकामांची माहिती वचननाम्यात दिली आहे. तसेच माळनाका उद्यानाचे सुशोभिकरण, रस्त्यांचे डांबरीकरण आदी विविध विकासकामांचे मतदारांना वचन दिले आहे.
शिवसेनेचा शहर विकासाचा नारा...
एकच ध्यास... रत्नागिरी शहराचा विकास... या घोषवाक्याने रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेणारा वचननामा शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांच्या हाती दिला आहे. या वचननाम्यातील शहर विकासाचा नारा मतदारांना किती भावतो, याची चर्चा आहे. या वचननाम्यात आमदार राजन साळवी यांनी आम्हीही विकास केला. पण सम्राट म्हणून शेखी मिरवली नाही, असा टोला शेट्येंना लगावला आहे, तर संसारे उद्यान शिवशाहीच्या माध्यमातून पूर्णत्त्वास गेल्याचा दावा आमदार उदय सामंत यांनी केला आहे.