शिवसेनेचे विनय मलुष्टे रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष

By Admin | Updated: February 27, 2016 01:26 IST2016-02-27T01:26:40+5:302016-02-27T01:26:40+5:30

भाजप-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार पराभूत

Vinay Malhothe of Shivsena, Deputy Chief of the Ratnagiri | शिवसेनेचे विनय मलुष्टे रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष

शिवसेनेचे विनय मलुष्टे रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष

रत्नागिरी : रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेना विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी युती यांच्यात झालेल्या थेट लढतीत शिवसेनेचे विनय तथा भैया मलुष्टे विजयी झाले. मलुष्टे यांना १५ मते मिळाली, तर भाजपच्या संपदा तळेकर यांना भाजप व राष्ट्रवादीच्या सदस्यांची मिळून १२ मते मिळाली. हात वर करून झालेल्या मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद ऊकर्डे यांनी विनय मलुष्टे यांच्या विजयाची घोषणा केली.
रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र, गुरुवारी रात्री भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी भाजपच्या संपदा तळेकर यांनी उपनगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सेनेतर्फे विनय मलुष्टे यांनी उमेदवारी दाखल केली. अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हात वर करून मतदान घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपदा तळेकर यांना भाजपची ८ व राष्ट्रवादीची ४ अशी १२ मते मिळाली. विनय मलुष्टे यांना सेनेच्या सर्व १५ सदस्यांची मते मिळाली. त्यामुळे मलुष्टे हे विजयी झाले.
मलुष्टे यांच्या विजयानंतर पालिका आवारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उपनगराध्यक्षांच्या दालनात मलुष्टे यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रमोद शेरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सेनेचे मलुष्टे हे उपनगराध्यक्षपदी विजयी होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. सेनेच्या नगरसेवकांना पक्षादेश बजावण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी उकर्डे यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे प्रतोद गैरहजर
रत्नागिरी नगरपरिषदेत एकूण २८ नगरसेवक असून, राष्ट्रवादीच्या ५ पैकी पक्षप्रतोद सुदेश मयेकर हे या निवडणूक प्रक्रियेवेळी अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क सुरू होते. शिवसेनेचे १५ नगरसेवक असून, भाजपचे ८ नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्यासह २७ जणांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
पती राष्ट्रवादीत, पत्नी सेनेत नगरसेवक
नगरसेवक उमेश शेट्ये हे तीन महिन्यांपूर्वी सेनेतून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. त्यांची पत्नी उज्ज्वला शेट्ये या मात्र अजून सेनेतच आहेत. मतदानावेळी भाजप उमेदवार तळेकर यांच्यासाठी उमेश शेट्ये यांनी हात वर केला, तर सेनेचे भैया मलुष्टे यांना मतदान करण्यासाठी पत्नी उज्ज्वला शेट्ये यांनी हात वर केला. पती-पत्नी तरीही पक्ष निराळे असे वेगळे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसत होते.

Web Title: Vinay Malhothe of Shivsena, Deputy Chief of the Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.