लांजा शहरातील डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:36+5:302021-05-28T04:23:36+5:30
लांजा : ग्रामस्थांचा कडाडून विरोध असलेल्या कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाची स्थळपाहणी आणि ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेण्यासाठी कोणत्याही ...

लांजा शहरातील डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांचा विरोध
लांजा :
ग्रामस्थांचा कडाडून विरोध असलेल्या कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाची स्थळपाहणी आणि ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांशिवाय बुधवारी सकाळी आलेल्या लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व अधिकारी यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रशासनाकडून जबरदस्तीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले गेले नाही. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन अखेर नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी माघारी परतले.
लांजा, कोत्रेवाडी येथे नियोजित डम्पिंग ग्राउंड प्रकल्पापासून लगतच विहिरी, वहाळ हे पाण्याचे स्रोत असून घरेही जवळपास आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प झाल्यास आम्हा लोकांना मोठ्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रकल्प रद्द केला जात नाही, तोपर्यंत आम्ही लढणार. त्यासाठी नगरपंचायतीसमोर उपोषण आणि प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लांजा नगरपंचायतीतर्फे प्रभाग क्रमांक ६ मधील कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ताही उपलब्ध नाही. ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विराेध करत लांजा नगरपंचायतीसह तहसीलदार, प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन सादर करून आपली बाजू मांडली आहे.
ग्रामस्थांचा विराेध असतानाही बुधवारी अचानकपणे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी यांनी स्थळपाहणी दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी यांच्यासमोर प्रकल्प रद्द झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली़ आपण प्रथम स्थळपाहणी करू या, असे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाची जागेवर पाहणी केली.
मुळातच १८६१ या गटात डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित असून, त्याला लागून असलेल्या १८६२ मध्ये सार्वजनिक विहीर आहे. तसेच लगतच लोकवस्ती व खासगी विहिरी आहेत. ही बाब यावेळी नागरिकांनी अधिकारी पाटील यांच्या लक्षात आणून दिली. तसेच मानवी वस्तीपासून डम्पिंग ग्राउंड प्रकल्प किती अंतरावर पाहिजे, अशी विचारणा केली़ तसेच विविध प्रश्नांची सरबत्ती यावेळी ग्रामस्थांनी अधिकारी व नगराध्यक्ष यांच्यावर केली. मात्र, याबाबत काेणतीच उत्तरे त्यांना देता आली नाहीत. त्याचबरोबर स्थळपाहणी करण्यासाठी आले असताना आपण कोणती कागदपत्रे घेऊन आला आहात, असे ग्रामस्थांनी विचारले असता कागदपत्रे दाखवण्यासही नकार दिला.
त्यामुळे नगराध्यक्ष व अधिकारी यांनी केलेला हा पाहणी दौरा म्हणजे केवळ लोकांची दिशाभूल करणारा आहे, असा आराेप ग्रामस्थांनी केला़