ग्रामसेविकेवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:45+5:302021-09-18T04:33:45+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे ग्रामपंचायतीमध्ये महिनाभरापूर्वी ग्रामसेविकेची कायमस्वरूपी नियुक्ती झाली होती. मात्र, महिना उलटला तरी ती ग्रामसेविका ...

ग्रामसेविकेवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे ग्रामपंचायतीमध्ये महिनाभरापूर्वी ग्रामसेविकेची कायमस्वरूपी नियुक्ती झाली होती. मात्र, महिना उलटला तरी ती ग्रामसेविका हजर न झाल्याने ग्रामपंचायतीची व ग्रामस्थांची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे हजर न होणाऱ्या त्या ग्रामसेविकेवर कारवाई करावी, अशी मागणी नांदिवडेच्या सरपंचांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नांदिवडे ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी असणाऱ्या ग्रामसेवकांची कळझोंडी ग्रामपंचायतीमध्ये बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्याच ग्रामसेवकांना नांदिवडेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यावेळी कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा म्हणून नांदिवडे ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर जवळच्याच कासारीसांडे लावगण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु तेही हजर झाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कळझोंडी ग्रामसेवकांमध्ये कार्यभार देण्यात आला. तेही पुन्हा नांदिवडेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे गुंबद सैतवडे येथील ग्रामसेवकामध्ये ग्रामपंचायतीचा कार्यभार देण्यात आला.
दरम्यान, जांभरुण येथील ग्रामसेविकेला महिनाभरापूर्वी नांदिवडेचा कायमस्वरूपी कार्यभार देण्यात आला. परंतु त्याही ग्रामसेविका अद्याप हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामसेविका हजर होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी मागणी नांदिवडे सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.