गावातील कोरोना रुग्णांपासून ग्राम -वाडी कृती दल अनभिज्ञच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:54+5:302021-06-30T04:20:54+5:30
रत्नागिरी : गावात होणाऱ्या कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात ...

गावातील कोरोना रुग्णांपासून ग्राम -वाडी कृती दल अनभिज्ञच
रत्नागिरी : गावात होणाऱ्या कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात नसल्याने गावांमध्ये या रुग्णांना विलगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत आहे. तसेच अहवाल उशिरा येत असल्याने या गावांमध्ये अशा व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे.
आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधित समोर येऊ लागले आहेत. परंतु चाचण्या झाल्या तरी त्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने या कालावधीत चाचणी केलेली व्यक्ती बाधित असेल तरीही तिचा अहवाल येण्यासाठी अनेक दिवस लागत असल्याने या कालावधीत ही व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग वाढू लागला आहे. त्यातच गावातील बाधितांची नावे ग्राम किंवा वाडी कृती दल यांच्याकडे येतच नसल्याने आपल्या वाडीतील कोण कोण बाधित आहेत, हे त्यांना उशिरा कळते.
शासनाने आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधित कळू लागले आहेत. मात्र, हा अहवाल येण्यासाठी दोन - चार दिवस, काही वेळा अगदी आठवडाही जातो. कोरोना चाचणी केल्यानंतर ती व्यक्ती अहवाल येईपर्यंत विलगीकरणात राहणे अपेक्षित असते. मात्र, ज्यांच्यात सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, किंवा सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तीही ॲंटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर घरी विलगीकरणात न राहात अनेक ठिकाणी विनाकारण फिरत बसतात. त्यामुळे अशा व्यक्ती प्रत्यक्षात पाॅझिटिव्ह आल्यास ज्यांच्या संपर्कात या व्यक्ती जातात, त्यांनाही बाधित होण्याचा धोका असतो. अनेक गावांमध्ये सध्या हे प्रकार सुरू आहेत. त्यातच अशा व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल उशिरा आल्यास अशी व्यक्तीचा संपर्क अधिकच वाढतो.
तसेच चाचणीचा अहवाल येण्यास अनेक दिवस जातात. त्यानंतर आलेला अहवालही त्या त्या गावच्या कृती दलाचा प्रमुख असलेला सरपंच किंवा वाडीप्रमुख यांना जाणे गरजेचे आहे. मात्र, बाधितांच्या नावांची यादी ग्रामकृती दलाच्या प्रमुखाकडे जात नसल्याने आपल्या गावात किंवा वाडीत कोण कोण पाॅझिटिव्ह आलेत, याची माहितीच कृती दलाच्या प्रमुखाला नसते. त्यामुळे अशा लोकांच्या वावरण्यावर लक्ष ठेवता येत नाही किंवा विलगीकरणात तातडीने दाखल करता येत नाही. यामुळे ग्राम कृती दलांमध्येही तीव्र नाराजी आहे. सध्या अनेक गावांमध्ये कोेरोनाचा संसर्ग वाढण्यामागे ही महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावांमध्ये पाॅझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी पाठवायला हवी तरच कृती दल याबाबत खबरदारीची उपाययोजना करू शकेल, अशा प्रतिक्रिया गावांमधून व्यक्त होत आहे.
कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल लगेच मिळत नाही. तोपर्यंत चाचणी केलेली व्यक्ती गावात, वाडीत अनेक ठिकाणी फिरते. त्यामुळे जर ही व्यक्ती पाॅझिटिव्ह आली तर तिच्यापासून या इतर लोकांनाही बाधित होण्याचा धोका असतो. म्हणूनच गावच्या कृती दलाच्या प्रमुखाकडे यादी आली तर खबरदारीच्या दृष्टीने अशांना विलगीकरणात ठेवता येईल. तसेच चाचणी केल्यानंतर तिचा अहवालही लवकर मिळायला हवा.
- तानाजी कुळ्ये, जिल्हा संपर्क प्रमुख, बहुजन विकास आघाडी, रत्नागिरी