‘त्या’ मृतदेहासाठी ग्रामस्थ पोलीस ठाण्यात

By Admin | Updated: March 28, 2015 00:03 IST2015-03-27T23:41:50+5:302015-03-28T00:03:24+5:30

मृतदेह बाहेर काढणार : बेपत्ता म्हणून तक्रार देताना समोर आली दुर्दैवी बातमी

In the village police station for 'those' dead bodies | ‘त्या’ मृतदेहासाठी ग्रामस्थ पोलीस ठाण्यात

‘त्या’ मृतदेहासाठी ग्रामस्थ पोलीस ठाण्यात

रत्नागिरी : आपले सासरे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी ते पोलीस स्थानकात गेले, पण त्यांनी दाखवलेल्या फोटोतील व्यक्तीचा मृतदेह चार दिवसांपूर्वी सापडला असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याहीपुढचे दुर्दैव म्हणजे त्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने त्याचे दफनही करण्यात आले होते. या दुर्दैवी वास्तवातील मृत व्यक्तीचे नाव दत्तात्रय भिकाजी नागवेकर (वय ५८) असे आहे. शहरातील जेल रोड येथे ते वैभव नावाचे हॉटेल ते चालवित होते. त्यांचा दफन केलेला मृतदेह मिळविण्यासाठी तोणदे या त्यांच्या मूळ गावातील लोकांनी शुक्रवारी सकाळी शहर पोलीस ठाणे गाठले. त्याबाबतची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आज, शनिवार सकाळपर्यंत हा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर २२ मार्च २०१५ रोजी एका प्रौढ व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मात्र, त्या मृताचे कोणीही नातेवाईक पुुढे न आल्याने नियमानुसार शहर पोलिसांतर्फे दोन दिवसांपूर्वीच मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. मात्र, गुरुवारी (२६ मार्च) शहर पोलीस ठाण्यात राजेश प्रकाश सुर्वे हे बेपत्ताची तक्रार दाखल करण्यास आले. त्यावेळी त्यांनी बेपत्ता असलेल्या दत्तात्रय नागवेकर यांचा फोटो पोलिसांना दिला असता भाट्ये येथे सापडलेल्या मृतदेहाचे फोटोशी साम्य असल्याचे आढळले.
तो फोटो सुर्वे यांना दाखविण्यात आल्यानंतर त्यांनी हेच दत्तात्रय नागवेकर असून ते आपले सासरे असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, दोन दिवसांपूर्वीच नागवेकर यांना बेवारस म्हणून दफन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे वृत्त नागवेकर यांच्या तोणदे गावात समजल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी मृतदेह मिळावा यासाठी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्यासोबत नागवेकर यांचे जावई राजेश नागवेकरही होते. सायंकाळी काही ग्रामस्थ व नागवेकर यांचे जावई व मुलगी हे पोलीस ठाण्यातच होते. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. नागवेकर यांचा मृतदेह आज, शनिवारी सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)

ओळखीचा असूनही...
भाट्ये सागरकिनारी नागवेकर यांचा मृतदेह सापडला होता. मात्र, हा मृतदेह कोणासही ओळखता आला नाही. नागवेकर हे जेल रोडलगत वैभव हॉटेल चालवित होते. त्याठिकाणी अनेक पोलीसही जेवणासाठी जात होते. मात्र, कोणालाही नागवेकर यांना ओळखता न आल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: In the village police station for 'those' dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.