सुरक्षित वाहन चालविणाऱ्या विजय घाणेकर यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST2021-08-27T04:34:17+5:302021-08-27T04:34:17+5:30
चिपळूण : येथील एस. टी. आगाराचे चालक विजय पांडुरंग घाणेकर गेली ३० वर्षे सुरक्षित वाहन चालवून सेवा देत आहेत. ...

सुरक्षित वाहन चालविणाऱ्या विजय घाणेकर यांचा गौरव
चिपळूण : येथील एस. टी. आगाराचे चालक विजय पांडुरंग घाणेकर गेली ३० वर्षे सुरक्षित वाहन चालवून सेवा देत आहेत. या सुरक्षित सेवेबद्दल आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
विजय घाणेकर हे कोंडमळा गावचे रहिवासी असून, प्रसिद्ध सागर क्रीडा मंडळाचे व एस. टी.च्या कबड्डी संघाचे खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून १९९० ला राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी आगारात सेवेला प्रारंभ केला. कायमस्वरूपी लांब पल्ल्याचे नियतन व कामगिरी करणारे चालक म्हणून ते प्रसिद्ध होते. २०१० ला चिपळूण आगारात बदली करून आल्यावर त्यांनी बऱ्याच कालावधीपर्यंत लांब पल्ल्याच्या नियतांवर कामगिरी केली. ३० वर्षांच्या कालावधीत त्यांच्याकडून कोणताही अपघात किंवा दुर्घटना घडलेली नाही. विशेष म्हणजे रत्नागिरी विभागात यावर्षी ३० वर्षे सुरक्षित सेवेचा मान प्राप्त करणारे ते एकमेव चालक आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार शेखर निकम, माजी सभापती पूजा निकम, अजय कोकाटे, शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक विलास घाणेकर, विजय घाणेकर, माजी नगरसेवक किसन भुवड, शंकर कापरे, कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख सचिन कदम, कामगार संघटनेची चिपळूण आगार सचिव रवी लवेकर, आदींनी तसेच आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के, विभाग नियंत्रक भोकरे विभागीय वाहतूक अधिकारी मेहतर व एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.