विजय बंधारेदोन हजारचा टप्पा पार
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:53:30+5:302015-11-04T00:08:27+5:30
जिल्हा परिषद : लोकसहभागातून वनराई,

विजय बंधारेदोन हजारचा टप्पा पार
रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई व विजय बंधाऱ्यांची कामे जोरदार असून, महिनाभराच्या कालावधीत बंधाऱ्यांनी २०००चा टप्पा ओलांडला असल्याने लाखो लीटर्स पाणी अडविण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये जूनच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये ९८ गावातील २२७ वाड्यांना भीषण पाणी टंचाई उद्भवली होती. यंदा गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई व विजय बंधारे उभारण्याचा निश्चिय केला. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला जिल्हाभरात ८ हजार ४६० बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करण्याचे आदेश दिले. पावसाळ्याचे दिवस संपल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि विद्यार्थी सर्वच बंधारे बांधण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले. ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यात गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या सहाय्याने श्रमदानाने बंधारे बांधले जात आहेत. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा अधिकाधिक सहभाग असावा, असे निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार स्वत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरुन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बंधारे उभारण्यास प्रोत्साहन देत आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख आणि जिल्हा मोहीम अधिकारी विनोदकुमार शिंदे हे प्रत्येक तालुक्यात जाऊन कामाचा आढावा घेत आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी व्यक्त केला. पाणीटंचाईवर मात : जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रोत्साहन २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी गावागावांमध्ये वनराई, विजय व कच्च्या बंधाऱ्यांच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. महिनाभराच्या कालावधीत बंधाऱ्यांची सुमारे २०७० कामे पूर्ण करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात येत होते. त्यामध्येही विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचा चांगला परिणाम उन्हाळ्यामध्ये दिसून येत होता. मागील वर्षी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम बंद करण्यात आले होते. हे बंधारे मग्रारोहयोतून उभारले जात होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बंधाऱ्यांची गरज भासू लागली आहे. पावसाच्या कमी प्रमाणामुळे भविष्यात पाणीटंचाईची झळ बसू शकते. त्यामुळेच वनराई बंधारे बांधले जात आहेत.