प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला मारहाण

By Admin | Updated: July 13, 2015 00:32 IST2015-07-12T23:15:53+5:302015-07-13T00:32:05+5:30

संगमेश्वर रुग्णालय : डॉक्टरविरुध्द शिवसेना कार्यकर्त्यांची धडक

The victim was beaten up by a woman | प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला मारहाण

प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला मारहाण

देवरूख : प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल झालेल्या महिलेलाच रूग्णालयातील डॉक्टरने मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात शनिवारी घडला. या उद्दाम डॉक्टरची उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी संगमेश्वरवासीयांमधून होत आहे. लवकरात लवकर या डॉक्टरची उचलबांगडी न झाल्यास सेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे - गुरववाडी येथील महिला प्रसुतीसाठी कळंबस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल झाली. येथील आशा समीना जावेद काझी यांच्यामार्फत त्या संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल झाली. या महिलेची तपासणी करण्यासाठी डॉ. संजय दिनकर वारे सरसावले. या महिलेला प्रसुतीच्या वेदना असह्य झाल्याने पाय झाडत असताना डॉ. वारे यांना लागला. महिलेने पाय चुकून लागल्याचे असल्याचे सांगितले.
मात्र, वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेने आपल्याला मुद्दाम लाथ मारल्याची ओरड डॉ. वारे यांनी सुरू केली. यानंतर डॉ. वारे यांनी या महिलेच्या पायावर फटके लगावले. यावरच न थांबता डॉ. वारे यांनी अर्वाच्च भाषेत संभाषण करत ‘जर तू लवकर प्रसूत झाली नाहीस, तर छत्रीने मारीन’, अशी धमकी दिली. घडलेला प्रकार महिलेने नातेवाईकांच्या कानावर घातला. याची माहिती शिवसैनिकांना मिळताच माजी सभापती सुजित महाडिक, प्रकाश घाणेकर, अनिल बोले, चंद्र्रकांत बाईत, कृष्णा मालप, फय्याज दळवी, सत्यवान विचारे यांनी त्वरित रूग्णालयात धाव घेतली. त्यांनी डॉ. वारे यांना धारेवर धरले.
तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या आक्रमकपणापुढे डॉ. वारे यांनी नमते घेत आपल्याकडून चुकून असा प्रकार झाल्याची कबुली दिली. यापुढे असा प्रकार होणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच महिलेची माफी मागितली.
या संतापजनक प्रकाराबाबत संगमेश्वरवासीयांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. वारे यांच्या बाबतीत वारंवार तक्रारी पुढे येत आहेत, आज तर त्यांनी कहरच केला. त्यामुळे डॉ. वारे यांची लवकरात लवकर उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही लवकरच जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. उचलबांगडी न झाल्यास वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच पेटणार, असे दिसत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The victim was beaten up by a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.