चिपळुणात भाज्यांचे दर गडगडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:04+5:302021-08-22T04:34:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : भाज्यांची आवक वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून चिपळुणात भाज्यांचे दर गडगडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

चिपळुणात भाज्यांचे दर गडगडले!
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : भाज्यांची आवक वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून चिपळुणात भाज्यांचे दर गडगडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन श्रावण महिन्यात १०, २० रूपये किलो दराने भाज्या मिळत असल्याने ग्राहकांची चंगळ झाली आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात भाज्यांचे दर वाढतात, मात्र यावर्षी उलट चित्र आहे.
भाज्यांचे दर दरदिवशी कमी होताना दिसत आहेत. सध्या टोमॅटो, कोबी, दोडके, शिमला मिरची, जाडी शिमला मिरची, पांढरी काकडी प्रत्येकी १० रूपये किलो दराने विकली जात आहे. गवार, तोंडली, घेवडी लांब शिमला मिरची, दुधी भोपळा १५ रूपये किलो, बीट, वांगी २० रूपये किलो, भेंडी २५ रूपये किलो, मटार ४० ते ५० रूपये, पावटा ३५ ते ४० रूपये, आलं ३० ते ४० रूपये, लांब वांगी, कांदे २० ते ५० रूपये किलो, बटाटे १५ ते २० रूपये किलो, लसूण ७० ते १०० रूपये किलो, सफरचंद ९० रूपये, सीताफळ २० रूपये, मोसंबी ५० रूपये, संत्री, पेर १०० रूपये, अननस २५ रूपये नग, पपई २० रूपये किलो, केळी ३० रूपये डझनने विकली जात आहेत.
एकीकडे काही भागात कमी दराने भाजी विकली जात असतानाच दुसरीकडे मात्र काही व्यापारी चढ्या दराने भाजी विकत आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच काही फळ विक्रेतेही मनाला वाटेल त्या दराने फळे विकत आहेत. सध्या बाजारपेठेत सेलचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याने फळांची खरेदीही वाढली आहे. त्याचा गैरफायदा काही व्यावसायिक घेत आहेत. भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले असून, आणखी काही दिवस असेच दर राहण्याची शक्यता आहे.