वायकरांना जिल्ह्यात फिरू देणार नाही
By Admin | Updated: January 10, 2016 00:37 IST2016-01-10T00:37:39+5:302016-01-10T00:37:39+5:30
नीलेश राणे यांचा इशारा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका

वायकरांना जिल्ह्यात फिरू देणार नाही
रत्नागिरी : घरपट्टी वसुलीला स्थगिती देण्यात आल्यानंतर वर्षभर ग्रामपंचायतींचे पूर्ण उत्पन्नच ठप्प झाले. गावाच्या विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमधील कामेच त्यामुळे ठप्प झाली. त्यांच्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना अनुदान किंवा मदत देता आली असती; पण रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांना या प्रश्नाची जाणच नाही. जर हे सत्ताधारी सुधारले नाहीत तर पालकमंत्र्यांची गाडी जिल्ह्यात कोठेही फिरू देणार नाही, असा सणसणीत इशारा माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी दिला.
शुक्रवारी रामपूरचा दौरा आटोपून रत्नागिरीत दाखल झालेल्या राणे यांनी शनिवारी काँग्रेसभुवन येथे पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारवर टीका करतानाच त्यांनी पालकमंत्री वायकर यांच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले. वर्षभर घरपट्टी आकारणे बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा उत्पन्नाचा मार्गच बंद झाला आहे. सक्षम अशा ग्रामपंचायतींची संख्या खूपच कमी आहे. घरपट्टीखेरीज कसलेही उत्पन्न नाही, अशा ग्रामपंचायतीच असंख्य आहेत. पण, त्याबाबत सरकारला कोणतेही सोयसुतक नाही. यात सर्वांत मोठा दोष पालकमंत्र्यांचा आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीने त्यासाठी काही ना काही तरतूद करणे गरजेचे होते; पण ज्यांच्या मतदारसंघात झोपडपट्टीच भरपूर आहे, अशा वायकर यांना घरपट्टी आणि झोपडपट्टीतील फरकच कळत नसावा, असा टोला राणे यांनी हाणला.
जिल्ह्यातील या प्रलंबित प्रश्नांमुळे जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. (प्रतिनिधी)
कोयनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करा
रवींद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी ते आपल्या मुंबईतील मतदारसंघाचा आणि कोयनेच्या पाण्याचाच जास्त विचार करतात. त्यामुळे त्यांना कोयनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करावे, असे पत्र आता आपण उद्धव ठाकरे यांना पाठविणार आहोत, असा टोला राणे यांनी मारला. जेव्हा पाहावे तेव्हा वायकर कोयनेचे पाणी मुंबईला वळविण्याचाच विचार करतात. त्यांना दुसरे काही सुचतच नाही, असेही ते म्हणाले.