अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिनचा काॅकटेल डाेस घेतल्यास मानवी शरीरावर त्याचे दुष्परिणाम हाेत नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र, पहिला आणि दुसरा डाेस वेगवेगळा घेतल्यास लसीची परिणामकारकता कमी हाेते, असा दावा तज्ज्ञ डाॅक्टरांनी केला आहे. त्याचा विपरीत परिणाम हाेत नसला तरी एकाच कंपनीचे दाेन डाेस घेणे फायदेशीर असल्याचेही सुचविले आहे.
सातत्याने वाढणाऱ्या काेराेना महामारीला राेखण्यासाठी लसीची उपलब्धता करण्यात आली आहे. भारतात सध्या काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसींच्या मात्रा दिल्या जात आहेत. ठरावीक अंतराने लसींचे दाेन डाेस दिले जात आहेत. काही ठिकाणी पहिला डाेस काेविशिल्डचा, तर दुसरा काेव्हॅक्सिनचा देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शरीरावर काेणतेही दुष्परिणाम झालेले नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. डाेसची परिणामकारकता पाहिजे असल्यास एकदा एक लस घेतल्यानंतर दुसरा डाेसही त्याच कंपनीचा घेणे गरजेचे आहे. वेगवेगळी लस घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास पुरेशी मदत मिळणार नसल्याचे तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितले आहे.
दाेन्ही डाेस हे वेगळेच आहेत. त्यामुळे एकदा एक डाेस घेतल्यानंतर दुसरी मात्राही त्याच डाेसची घेतली पाहिजे. वेगवेगळे डाेस घेतल्यास त्याचा परिणाम शरीराच्या प्रतिकारशक्तीवर हाेऊ शकताे.
- डाॅ. बबिता कमलापूरकर,
जिल्हा आराेग्य अधिकारी
रत्नागिरी जिल्ह्यात असा प्रकार नाहीच
रत्नागिरी जिल्ह्यात आराेग्य विभागातर्फे याेग्य नियाेजन करण्यात येत आहे. त्यामुळे असा गाेंधळ अद्यापही काेणत्या केंद्रावर झालेला नाही.
रत्नागिरीत लसीबाबत गाेंधळ झाला नसला तरी प्रमाणपत्राचा घाेळ झाला आहे. काेविशिल्डची लस घेतल्यानंतर काेव्हॅक्सिनचे प्रमाणपत्र दिले गेले.