चिपळुणात टोकन पध्दतीने लसीकरण करावे : उमेश सकपाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:57+5:302021-05-11T04:33:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ऑनलाइन लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असून, त्या तुलनेत लसींचे डोस उपलब्ध होत नाहीत. ...

Vaccination should be done by token method in Chiplun: Umesh Sakpal | चिपळुणात टोकन पध्दतीने लसीकरण करावे : उमेश सकपाळ

चिपळुणात टोकन पध्दतीने लसीकरण करावे : उमेश सकपाळ

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : ऑनलाइन लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असून, त्या तुलनेत लसींचे डोस उपलब्ध होत नाहीत. कोकणसारख्या ग्रामीण भागात लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अडचणीचे आहे. त्यातच ऑनलाइन लसीकरणात गोंधळ होत आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच टोकन पद्धतीचा अवलंब करून लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक उमेश सकपाळ यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शहरासह ग्रामीण भागातील लोकांना टोकन पद्धतीने सुरू असणारे लसीकरण सोयीचे ठरत होते. आता १८ ते वयोगटातील लोकांसाठी ऑनलाइन लसीकरण सुरू केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ऑनलाइन नाेंदणी करूनही लस मिळत नाही. चिपळूण शहरातील नागरिकांना ३० ते ४० किलोमीटरवरील लसीकरण केंद्र दिले जाते. इतक्या दूरवर जाऊन लस घेणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे. शिवाय ही प्रक्रियाही खूप वेळखाऊ आहे. टोकन पद्धतीने लसीकरण केल्यास पालिका, आरोग्य विभाग त्याचे योग्य नियोजन करेल. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लसीकरण तातडीने होण्याची आवश्यकता आहे. यासाठी लसीकरणात सुसूत्रता असायला हवी, असे ते म्हणाले़

ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. मात्र महिना उलटून गेला तरी दुसरा डोस मिळत नाही. सुरुवातीला कोवॅक्सिन लस आली. मात्र दुसऱ्या डोसकरिता ती लस उपलब्ध होत नाही. या साऱ्या बाबींचा प्रशासनाने, शासनाने विचार करायला हवा. ऑनलाइन नोंदणी ऐवजी टोकन पद्धत सुरू केल्यास ती लोकांना तसेच स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांना सोयीचे ठरणार आहे. जितके डोस उपलब्ध आहेत. तितकेच टोकन देण्यात आल्याने अनावश्यक गर्दी होणार नाही. त्यासाठी पूर्वीप्रमाणेच लसीकरणासाठी टोकन पद्धत राबविण्यात यावी, अशी मागणी सकपाळ यांनी केली आहे.

Web Title: Vaccination should be done by token method in Chiplun: Umesh Sakpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.