लसीकरण मंडणगडात, गर्दी अन्य तालुक्यातील लाेकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:32+5:302021-05-25T04:35:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन नाेंदणीमुळे लसीकरणातील गाेंधळ अजूनही कमी झालेला नाही. मंडणगडात साेमवारी देण्यात ...

लसीकरण मंडणगडात, गर्दी अन्य तालुक्यातील लाेकांची
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन नाेंदणीमुळे लसीकरणातील गाेंधळ अजूनही कमी झालेला नाही. मंडणगडात साेमवारी देण्यात आलेल्या १०० लसींच्या डाेसमध्ये ७० जण हे तालुक्याबाहेरील, तर शहरातील केवळ ३० जणांचा समावेश आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाेंधळ घातला. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केंद्रावर येऊन याबाबत जाब विचारला. हा गाेंधळ टाळण्यासाठी ऑफलाईन लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मंडणगड शहरामध्ये साेमवारी लसीकरण माेहीम राबवण्यात आली. शहरासाठी १०० लसींची मात्रा देण्यात आली हाेती. शहरातील लसीकरणासाठी ऑनलाईन नाेंदणी आवश्यक करण्यात आली आहे. मात्र, ही नाेंदणी करताना अनंत अडचणी येत असून, काही मिनिटातच नाेंदणी फुल्ल झाल्याचे दाखविण्यात येते. त्यामुळे अनेकांना नाेंदणी करता येत नाही. साेमवारी झालेल्या लसीकरणादरम्यान नाेंदणी झालेल्यांमध्ये ७० जण हे अन्य तालुक्यातील असल्याचे समाेर आले, तर केवळ ३० जणच शहरातील हाेते. त्यामुळे उपस्थितांनी गोंधळ घालून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वैभव कोकाटे, राकेश साळुंखे यांना घटनास्थळी बोलावले.
त्यांनी प्रशासनास याबाबतचा जाब विचारत लसीकरण सुरू झाल्यापासून तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर हीच परिस्थिती आह. लसीकरणात तालुक्यातील जनतेचे केवळ २५ ते ३० टक्के लसीकरण होत आहे. पण, ऑन रेकाॅर्ड मात्र तालुक्याच्या लसीकरणाची आकडेवारी फुगीर दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. हे असेच सुरू राहिले तर तालुक्यातील सुुमारे ७० टक्के लोक लसीकरणापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त केली.
याबाबत तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, आरोग्य अधिकारी पितळे, केंद्रप्रमुख, पोलीस निरीक्षक वराळे यांच्या उपस्थितीत यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर यापुढील लसीकरण मंडणगड तालुक्यासाठी ऑफलाईन घेण्यात येईल, तसेच तालुक्यातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येईल, असे सांगून या कारभारावर पडदा टाकण्यात आला.
यावेळी मागील लसीकरणाची तपशीलवार माहिती घेऊन तालुक्याबाहेरील लसीकरणाची आकडेवारी काढून, तेवढी अधिकची लस तालुक्यासाठी मागण्याची मागणी राकेश साळुंखे यांनी केली. त्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत योग्य कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष मुज्जफर मुकादम, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, रूपेश साळुंखे, तालुका सचिव सुभाष सापटे यांच्यासह आनंद नाडकर उपस्थित होते.
-------------------------------
मंडणगड शहरात लसीकरण केंद्रावर शहरातील नागरिकांना वंचित ठेवण्यात आल्याने नागरिकांनी गाेंधळ घातला. त्यामुळे लसीकरण केंद्रात नागरिकांनी गर्दी केली हाेती़.