चिपळुणात लसीकरण ‘वेटिंग लिस्ट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:26+5:302021-04-24T04:32:26+5:30
चिपळूण : शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. परिणामी ऑनलाइन बुकिंग तसेच टोकन घेऊन लस घेण्यासाठी नागरिक पुढे येऊ ...

चिपळुणात लसीकरण ‘वेटिंग लिस्ट’वर
चिपळूण : शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. परिणामी ऑनलाइन बुकिंग तसेच टोकन घेऊन लस घेण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. यातूनच लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. उन्हाच्या झळा सोसत लस घेण्यासाठी ज्येष्ठांसह महिला रांगेत तासन्तास उभ्या होत्या. काही खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही आठ-आठ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. सुरुवातीला लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लस घेण्यावर नागरिकांनी भर दिली आहे. सुरुवातीला पवन तलाव मैदानावरील केंद्रात लसीकरण केले जात होते. तिथे सुविधांची वानवा असल्याने नगर परिषद शॉपिंग सेंटरमध्ये लसीकरणास सुरुवात झाली. दरम्यान वेळेत लस मिळण्यासाठी नागरिक पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. सकाळी टोकन घेतल्यावर नंतर लसीकरणासाठी पुन्हा येतात. दरम्यान लस घेण्यासाठी ४५ वर्षावरील नागरिक व महिलांनी ऑनलाइन बुकिंगही केले आहे. बुकिंग केलेल्या लोकांना कोणत्या वेळेत केंद्रात यायचे याविषयीची माहिती मेसेज स्वरूपात दिली जाते.
शुक्रवारी सुमारे ३०० ते ३५० लोकांनी लसीकरणासाठी हजेरी लावली होती. भरउन्हाच्या कडाक्यात लोक रांगेत उभे होते. लसीकरणासाठी आलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यासाठी निवाऱ्यांची व्यवस्था नव्हती. भरउन्हात रांगेत उभे असलेले लोक पाण्यासाठी कासावीस झाले होते. याविषयी नागरिकांची ओरड झाल्यानंतर स्वतः मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत लोकांना पाण्याच्या बाटल्या दिल्या. शॉपिंग सेंटर ठिकाणी असलेले शौचालय बंद होते. शौचालयास लॉक असल्याने नागरिकांना त्याचा वापर करता येत नव्हता. नगर परिषद कर्मचाऱ्यांना सांगूनही लॉक काढण्यात आले नाही.
शेवटी संतप्त नागरिकांनीच लॉक तोडून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र, लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला होता. नागरिक शिस्त पाळत नव्हते. त्यांना शिस्तही लावली जात नव्हती. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या जिन्यात तर नागरिकांनी टिच्चून गर्दी केली होती.
................................
शहरात एकाच ठिकाणी लसीकरण सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होते. ज्येष्ठ नागरिक व महिलांनाही तासन्तास तिष्ठत बसावे लागते. शहरात प्रभागनिहाय लसीकरणाचे नियोजन केल्यास फारशी गर्दी होणार नाही. तासन्तास रांगेतही उभे रहावे लागणार नाही.
- दौलत देसाई, चिपळूण