जनावरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:02+5:302021-08-21T04:36:02+5:30
आबलोली : मांडकी - पालवण गोविंदरावजी निकम काॅलेज ऑफ ॲग्रीकल्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत लसीकरण माेहीम हाती घेण्यात ...

जनावरांचे लसीकरण
आबलोली : मांडकी - पालवण गोविंदरावजी निकम काॅलेज ऑफ ॲग्रीकल्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत लसीकरण माेहीम हाती घेण्यात आली. गुहागर तालुक्यातील जांभारी गावचे शेतकरी संदीप दिवेकर यांच्या गोठ्यातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. प्राचार्य डी. एन. यादव यांनी मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. पी. पी. हळदणकर यांच्याकडून हे लसीकरण करून घेतले.
वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथम
खेड : क्रांतिदिनानिमित्त मोरवंडे - बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत पल्लवी कदम हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नुपूर मेहता हिने द्वितीय, तर शुभम चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धाप्रमुख म्हणून प्राचार्य श्रध्दा विचारे, प्राचार्य धनश्री आंब्रे, प्राचार्य विनायक सुर्वे यांनी काम पाहिले.
महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार
खेड : बिकट स्थितीत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या खेड, मंडणगड, दापोली तालुक्यातील वीज कर्मचाऱ्यांचा आमदार योगेश कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख विजय जाधव, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, युवासेना जिल्हाधिकारी अंजिक्य मोरे व अन्य उपस्थित होते.
पाऊस कायम
दापोली : दापोली तालुक्यात बुधवारपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाची अजूनही हजेरी कायम आहे. पावसामुळे कोणत्याही आपत्तीची तहसील कार्यालयात नोंद नाही. गेले काही दिवस पाऊस गायब झाला होता. परंतु, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे.
ग्रंथपाल दिन
खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे - बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डाॅ. उमेशकुमार बागल यांनी ग्रंथालयाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन प्राचार्य विनायक सुर्वे यांनी केले, तर भारत चव्हाण यांनी आभार मानले.
बालाजी लोंढे खेडचे मुख्याधिकारी
खेड : खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची चिपळूण येथे बदली करण्यात आली आहे. यामुळे रिक्त झालेल्या जागी देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत खेड मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, आता याठिकाणी लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. लोंढे हे मूळचे सोलापूरचे आहेत. ते लवकरच खेडचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
शैक्षणिक साहित्य
खेड : पुणे येथील खेड युवाशक्ती पिंपरी - चिंचवडतर्फे नुकसानग्रस्त १५० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंसह शैक्षणिक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले. यावेळी खेड युवा शक्तीचे अध्यक्ष अभिजीत कदम, सचिव अंकुश चव्हाण यांच्यासह युवाशक्तीचे २५ सदस्य उपस्थित होते.
मदतीचे हात
देवरुख : समत्व ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या प्रेरणेतून ट्रस्टचे नरेंद्र खानविलकर यांच्याहस्ते चिपळूण येथे आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. खेर्डी, मुरादपूर, शंकरवाडी, वाणीआळी, पवार आळी, मार्कंडी साबळे रोड, ओतारी गल्ली, खेड बाजारपेठ या ठिकाणी वस्तू वाटण्यात आल्या. यासाठी रुपेश कांबळे, रेश्मा वाजे, गणपत दाभोळकर, विराज भालेकर व प्रणित कांबळे यांचे सहकार्य लाभले.