मतदानासाठी भारतात टाकाऊ प्रणालीचा वापर
By Admin | Updated: July 30, 2014 23:58 IST2014-07-30T23:58:23+5:302014-07-30T23:58:40+5:30
वामन मेश्राम : निवडणुकीत ‘गडबड’ करून निवडून येण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप

मतदानासाठी भारतात टाकाऊ प्रणालीचा वापर
रत्नागिरी : मतदानासाठी भारतात वापरण्यात येत असलेली इलेक्ट्रॉनिक मशिन्स ही जगात टाकाऊ प्रणाली म्हणून ओळखली जाते. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन्स (इव्हीएम) मध्ये गडबड करून काही नेते जिंकून आल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे (बामसेफ) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांनी रत्नागिरीत झालेल्या राष्ट्रव्यापी महा जन- जागरण अभियानप्रसंगी केले.
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भारत मुक्ती मोर्चातर्फे राष्ट्रव्यापी महा जन-जागरण अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सद्वारे निवडणूक आयोगाकडून मानव अधिकाराचे उल्लंघन हा या अभियानातील चर्चेचा विषय होता.
या अधिवेशनाला बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, संदीप ढवळ, जिल्हा हज कमिटीचे अध्यक्ष रफीक बिजापुरी, भंडारी समाजाचे अध्यक्ष शरद बोरकर, राष्ट्रीय महिला मूल निवासी संघ, रत्नागिरीच्या अध्यक्ष संगीता शिंदे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुरेश जाधव, शरद मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेश्राम पुढे म्हणाले की, प्रगत देशात कुठेच इलेक्ट्रॉनिक्स मशिन्स वापरत नसतानाही अशी टाकाऊ प्रणाली ज्या देशात ७० टक्के लोक अशिक्षीत तसेच अर्धशिक्षित आहेत, अशा देशात वापरण्यामागे त्यात गडबड करून निवडून येणे, हेच मोठे षडयंत्र आहे. लोकशाहीने मतदानाचा हक्क दिला तरी निवडून येण्यासाठी १९५२ पासून सातत्याने जनतेची दिशाभूल होत आरोप मेश्राम यांनी केला. यावेळी त्यांनी या सर्व निवडणुकांबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)