‘युपीएल’मध्ये कंत्राटदाराला मारहाण
By Admin | Updated: May 11, 2014 00:05 IST2014-05-11T00:05:32+5:302014-05-11T00:05:32+5:30
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील युटीलिटी पॉवर लिमिटेड (युपीएल) या ठेकेदार कंपनीकडून देय असलेल्या सुरक्षा अनामत

‘युपीएल’मध्ये कंत्राटदाराला मारहाण
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील युटीलिटी पॉवर लिमिटेड (युपीएल) या ठेकेदार कंपनीकडून देय असलेल्या सुरक्षा अनामत रक्कमेबाबत विचारणार्या परप्रांतीय ठेकेदाराच्या श्रीमुखात लगावण्यात आली. युपीएलच्या हिशेबनीसाविरोधात गुहागर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी १० वा. ‘युपीएल’च्या कार्यालयात हा प्रकार घडला. युपीएल ही रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमधील विविध कामांचे विनियोजन करणारी प्रमुख ठेकेदार कंपनी आहे. याचा कंपनीमार्फत कंपनीतील प्रत्येक कामाची निविदा प्रक्रिया, कामांचे वितरण खरेदी, देखभाल इत्यादी आदी प्रक्रिया चालते. या कंपनीच्या खाली सुमारे १५ ते २० लहानमोठ्या कंत्राटदार कंपन्या काम करतात. यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळ पुरविणार्या कंत्राटदार आहेत. यामधील अनेकांची सुरक्षा अनामत कंपनीकडून देय आहे. युपीएल कंपनीकडून गेली अनेक वर्षे ठराविक कंत्राटदारांची सुरक्षा अनामत रखडली आहे. वेळेवर पगार करणे शक्य होत नसल्याने कंत्राटदारांची ओढाताण होत आहे. यातूनच शनिवारी सकाळी युपीएलच्या कार्यालयात सुरक्षा अनामतीची विचारणा करायला गेलेल्या टेक्नोटेक कंपनीच्या विनोद शर्मा या परप्रांतीय ठेकेदाराच्या युपीएलच्या प्रमोद चव्हाण याने थोबाडीत मारले व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रमोद चव्हाण याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान प्रमोद चव्हाण यानेही पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. (वार्ताहर)