विद्यापीठातील प्राध्यापकाला अटक

By Admin | Updated: February 27, 2016 01:08 IST2016-02-27T01:08:40+5:302016-02-27T01:08:40+5:30

जमीन खरेदीत फसवणूक : मुंबईतील सुभाष जैन यांची पोलीस स्थानकात तक्रार

University professor arrested | विद्यापीठातील प्राध्यापकाला अटक

विद्यापीठातील प्राध्यापकाला अटक

रत्नागिरी : जागा खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. व्ही. जी. नाईक याला दापोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याबरोबर सडवेतील एकाला अटक करण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनासह संपूर्ण कोकणात खळबळ उडाली आहे.
मुंबई-मालाड येथील सुभाष कन्हैय्यालाल जैन यांना २ कोटी ४० लाख रूपयांमध्ये ३०० एकर जमीन खरेदीचे आमिष दाखवून प्रत्यक्षात ४९ लाख ५१ हजार रूपये किंंमतीची ३८ एकर जमीन देणे आणि एकूण रक्कमेपैकी १ कोटी ९९ लाख ४९ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात प्रा. विठ्ठल गोविंंद नाईक उर्फ व्ही. जी. नाईक याच्यासह सडवे येथील शशिकांत नांदीस्कर अशा दोघांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०१२मध्ये मुंबई-मालाड येथील सुभाष कन्हैय्यालाल जैन यांना दापोलीत ३०० एकर जमीन खरेदी करून देण्याचे आश्वासन प्रा. व्ही. जी. नाईक आणि शशिकांत नांदीस्कर यांनी दिले. जमीन खरेदीसाठी एकूण व्यवहाराची रक्कम २ कोटी ४० लाख रूपये ठरली. सन २०१२ ते २०१४ पर्यंत व्यवहार ठरल्यापैकी तालुक्यातील सडवे येथील ३८ एकरची जमीन जैन यांच्या नावावर करण्यात आली. यानंतर जैन यांनी चेकने या दोघांना रक्कम अदा करण्यास प्रारंभ केला. यानंतर याच ३८ एकर जमिनीमधील १० एकर जमीन सुभाष जैन यांच्या बायकोच्या नावावर त्याचप्रमाणे जैन यांच्या मुलाच्या नावावर देखील १० एकर जमीन करण्यात आली. मात्र, एकदा खरेदी झालेल्या जमिनीची त्याच मालकाच्या घरातील सदस्यांना दोनवेळा खरेदीखते करून देण्यात आली. जैन यांनी आपल्या एकूण ५८ एकर जमिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, तोपर्यंत प्रा. व्ही. जी. नाईक आणि शशिकांत नांदीस्कर या दोघांनी जैन यांच्याकडून २ कोटी ४० लाख रूपये उकळले होते.
जैन यांनी याबाबत माहीम-मुंबई पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर अधिक तपासासाठी हा गुन्हा दापोली पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालून सखोल चौकशी केली. त्याचप्रमाणे जैन यांनीदेखील आपण पूर्ण रक्कम दिल्याचे पुरावे पोलिसांना सादर केले. यामुळे रविवारी जैन यांच्या तक्रारीवरून भा. दं. वि. ४२० अन्वये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा प्रा. नाईक व नांदीस्कर या दोघांवर दाखल करण्यात आला. पोलिसांनी या दोघांना गुरूवार, २५ फेब्रुवारीला दापोली न्यायालयात हजर केले. या दोघाही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक डॅनियल बेन करत आहेत.
प्रा. नाईक या विद्यापीठातील अधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रा. नाईकने फसवणूक केल्याची चर्चा यापूर्वी सुरू होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर प्रा. नाईकचा फसवेपणा दापोलीकरांसमोर आला आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक चौकशी सुरू असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा डॅनियल बेन यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
खळबळ : पोलीस तपासाची चके्र फिरली
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील प्राध्यापकाने जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याने यापूर्वीही फसवणुकीचे प्रकार केल्याचे वृत्त आहे. त्यानुसार आता पोलिसांनी तपासाची चके्र फिरवली आहेत.
कडक कारवाई
या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Web Title: University professor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.