मुंबई विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:04+5:302021-09-02T05:08:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ‘ देशातील अग्रगण्य विद्यापीठ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ ...

मुंबई विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ श्रेणी
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘ देशातील अग्रगण्य विद्यापीठ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून (नॅक) मुंबई विद्यापीठास ३.६५ सीजीपीए गुणांकन देण्यात आले आहे. ‘नॅक’कडून सर्वाधिक गुण मिळविणारे मुंबई विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
नॅक पीअर टीमने गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठास मूल्यांकनासाठी भेट दिली होती. पहिल्या टप्प्यांतर्गत नवीन निकषांनुसार विद्यापीठाने आयआयक्यूए आणि स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल सादर केला होता. दुसऱ्या टप्प्यांतर्गत विद्यार्थी समाधान सर्वेक्षण (स्टुडेंट्स सॅटिसफॅक्शन) सर्वेक्षण आणि विद्यापीठाने सादर केलेल्या माहितीची विधिग्राह्यता आणि पडताळणीची प्रक्रिया (डेटा व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन) प्रक्रिया पार पडली.
नॅकच्या पीअर टीमच्या पहिल्या दिवसाच्या भेटीदरम्यान विविध १२ विभागांचे सादरीकरण तर दुसऱ्या दिवशी १५ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांचे सादरीकरण करण्यात आले. कुलसचिव, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, वित्त व लेखा अधिकारी, आयक्यूएसी सेलचे सादरीकरण, विद्यार्थी, पालक, संशोधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी पीअर टीमने संवाद साधला तसेच विविध विभागांना भेटी, प्रयोगशाळा पाहणी, पायाभूत सुविधा, ग्रंथालय भेटी देण्यात आल्या. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधन वृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास याबाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
-----------------------
मुंबई विद्यापीठाला नॅककडून ‘अ’ ची श्रेणीसह सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे. हे अत्यंत अभिमानस्पद व अभिनंदनीय बाब आहे. विद्यापीठाच्या १६४ वर्षांच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. ज्ञानदानाची उज्ज्वल आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाला मिळालेल्या या सर्वोत्तम श्रेणीचा फायदा हा विद्यापीठासह सर्वच भागधारकांना नक्कीच होईल.
- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ