मुबलक पाण्याचे असमान वाटप

By Admin | Updated: July 9, 2014 23:55 IST2014-07-09T23:41:48+5:302014-07-09T23:55:47+5:30

भातगाव-कोसबीवाडी : डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

Uneven distribution of abundant water | मुबलक पाण्याचे असमान वाटप

मुबलक पाण्याचे असमान वाटप

गुहागर : तालुक्यातील भातगाव कोसबीवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. धरणाचा पऱ्या (कोंडी) येथे मुबलक पाणी असूनही या पाण्याचे असमान वाटप होत असल्याने महिलांना पाण्यासाठी कष्ट उपसावे लागत आहेत.
सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही काहीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोसबीवाडी ही तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील डिंगणकरवाडी, वेल्येवाडी आणि मराठवाडी या तीन वाड्यांसाठी धरणाचा पऱ्या (कोंडी) या एकाच ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, तीन वाड्यांना होणारे पाणीवाटप सदोष आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे प्रतिदिन माणसी ४० लीटर पाणी मिळायला हवे. मात्र, या ठिकाणी कमी लोकवस्तीला अनावश्यक इतके मोठ्या प्रमाणात पाणी मिळते. त्या तुलनेत जास्त लोकसंख्या असलेल्या डिंगणकरवाडी आणि वेल्येवाडी ग्रामस्थांना अपुरे पाणी दिले जात आहे.
निसर्गाने मुबलक दिलेले पाणी मानसिक विषमतेमुळे आपल्याला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी वारंवार केली. तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दि. २ फेब्रुवारी २०१३ व त्यानंतर वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा केला. तत्कालीन तहसीलदारांनी याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. असमान आणि सदोष पाणीवाटपाचा उपअभियंत्यांचा अहवाल आल्यावर त्यापुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांसह नायब तहसीलदार सुहास थोरात, तत्कालीन गटविकास अधिकारी आदींनी पाहणी केली. उपअभियंत्यांनी आपला अहवाल सादर केला. त्यानुसार नैसर्गिक उद्भव असलेल्या उंचावरील ठिकाणाहून वेल्येवाडीपर्यंत चरी मारुन पाणी आणलेले आहे. तिथे बांधलेल्या हौदांमध्ये पाण्याचे विभाजन होते. मराठवाडीतील १११ घरांसाठी २४ तास २८ हजार ८०० लीटर पाणी, तर डिंगणकरवाडीतील २०७ आणि वेल्येवाडीतील ३११ मिळून एकूण ५१८ लोकसंख्येसाठी प्रतिदिन ७ हजार २०० लीटर पाणी दिले जाते. शासनाच्या निकषानुसार मराठवाडीला २४ हजार लीटर अधिकचे पाणी, तर डिंगणकरवाडी व वेल्येवाडीला मिळून १३ हजार ५२० लीटर कमी पाणी मिळते. समान पाणी वाटप झाल्यास दरडोई प्रतिदिन ५७.२० लीटर पाणी मिळू शकेल. या अधिकाऱ्यांचा अहवाल धूळ खात पडला आहे. भर पावसाळ्यातही डिंगणकरवाडीतील महिला डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Uneven distribution of abundant water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.