ट्रॅक्टरखाली सापडून ऊसतोड मजूर ठार
By Admin | Updated: February 6, 2015 00:38 IST2015-02-05T23:21:23+5:302015-02-06T00:38:03+5:30
सुपनेतील घटना : तोल गेल्याने चालत्या ट्रॅक्टरमधून कोसळला

ट्रॅक्टरखाली सापडून ऊसतोड मजूर ठार
कऱ्हाड : चालत्या ट्रॅक्टरमधून पडल्यानंतर चाकाखाली सापडून ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. सुपने (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. बाळू राजू निकम (वय ३५, रा. संगमेश्वर-बुरुंदी, जि. रत्नागिरी) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील काहीजण सुपने येथे एका गुऱ्हाळगृहावर ऊसतोड मजुरीसाठी आले आहेत. गुऱ्हाळगृहाच्या ठिकाणीच ते झोपडी घालून कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास आहेत. या मजुरांपैकी बाळू निकम हा बुधवारी काही कामानिमित्त सुपने नवीन गावठाणात आला होता. काम संपल्यानंतर तो जुन्या गावठाण रस्त्याला असणाऱ्या गुऱ्हाळगृहाकडे चालत जाणार होता. मात्र, गुऱ्हाळगृहासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर त्याचवेळी ऊस भरून जुन्या गावठाणाकडे निघाल्याचे बाळू निकमने पाहिले. त्याने हात दाखविल्यामुळे चालकानेही ट्रॅक्टर थांबवून त्याला ट्रॅक्टरमध्ये घेतले. ट्रॅक्टर जुन्या गावठाणाकडे निघाला असताना अचानक ट्रॅक्टरच्या मडगार्डवर बसलेल्या बाळू निकमचा तोल जाऊन तो खाली पडला. अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद तालुका पोलिसांत झाली आहे. सहायक फौजदार वाय. जी. बडेकर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)