देवरूख : घटस्फोटाचा दावा न्यायालयात गेल्याने मनातून खचलेल्या पतीने तणावाखाली चिरेखाणीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरूखजवळील ओझरे खुर्द येथे शनिवारी निर्दशनास आली. संतोष विठोबा जागुष्टे (वय ४२, रा. ओझरे खुर्द-गणेशवाडी, संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.संतोष जागुष्टे हे ३ सप्टेंबर रोजी सकाळी कामाला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने व फोनही बंद लागत असल्याने घरच्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध व चौकशी केली. शोध मोहीम सुरू असताना ओझरे खुर्द येथीलच चिरेखाणीमध्ये शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.याची माहिती देवरूख पोलिसांना देताच हेडकॉन्स्टेबल श्रीकांत जाधव व संदीप जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. यावेळी हा मृतदेह संतोष जागुष्टे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.या घटनेची फिर्याद विठोबा जागुष्टे यांनी दिली आहे. त्यानुसार संतोष व त्यांच्या पत्नीचे काही कारणावरून पटत नव्हते. दाेघांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे संताेष जागुष्टे मनातून खचले हाेते. त्या तणावाखाली त्यांनी खणीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.देवरूख ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास देवरूख पोलिस करीत आहेत.
Ratnagiri: घटस्फोटाच्या तणावातून पतीने चिरेखाणीत उडी घेत संपविले जीवन, ओझरे खुर्द येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:59 IST