अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम

By Admin | Updated: September 16, 2015 00:48 IST2015-09-16T00:46:05+5:302015-09-16T00:48:57+5:30

गणेशोत्सवाच्या काळातच कारवाई झाल्याने नाराजी

Unauthorized construction campaign | अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम

अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम

राजापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार राजापूर नगर परिषदेने शहरातील विजय शिवराम चव्हाण यांनी केलेले अनधिकृत बांधकाम हटवले. गणेशोत्सवाच्या काळातच ही कारवाई झाल्याने चव्हाण कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील चव्हाणवाडीमधील विजय चव्हाण यांनी घराच्या मागील बाजूला संडास बाथरुमसह पडवीचे बांधकाम केले होते. त्यासाठी राजापूर नगर परिषदेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. याबाबतचा अहवाल पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी राजापूर पालिकेने पोलीस संरक्षण घेऊन ते अनधिकृत बांधकाम हटवले. दुपारपर्यंत ही कारवाई सुरु होती.
गणेशोत्सवाच्या काळात राजापूर नगर परिषदेकडून चव्हाण यांचे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. या बांधकामाला अधिकृत परवानगी मिळावी, यासाठी विजय चव्हाण यांनी २०११ साली राजापूर नगर परिषदेकडे अर्ज केला होता. मात्र, त्या बांधकामाला परवानगी दिली नव्हती. त्यानंतर काही वर्षांचा कालखंड उलटला. नगर परिषद प्रशासनाने त्या बांधकामाबाबत ब्र देखील काढला नवहता. मात्र, विजय चव्हाण यांचे बंधू मोहन चव्हाण यांनी आपल्या घराच्या मागील बाजूला नुरबी मालदार यांनी केलेल्या खोदकामाबाबतची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांच्या आपले सरकार या पोर्टलवर दाखल केल्यानंतर सूत्र वेगाने हलली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राजापूर नगर परिषदेकडे अहवाल मागवला गेला. अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अहवालाच्या आधारे संबंधित अनधिकृत बांधकाम तत्काळ हटवण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी सकाळी राजापूर पालिकेच्या बांधकाम विभागाने पोलीस संरक्षण घेऊन चव्हाणवाडीत प्रवेश केला व अनधिकृत बांधकाम तोडायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या कारवाईने चव्हाण कुटुंबीय बावचळून गेले. बांधकाम हटवण्याबाबत कोणतीच नोटीस बजावण्यात आलेली नसल्याचे विजय चव्हाण यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मंगळवारी दुपारपर्यंत अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम सुरु होते.
पालिकेच्यावतीने अधूनमधून अनधिकृत बांधकामे हटवण्याची धडक मोहीम राबवली जाते. तशाच प्रकारे अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized construction campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.