उमेश शेट्येंकडून पालिकेची फसवणूक : कीर
By Admin | Updated: October 30, 2015 23:11 IST2015-10-29T23:45:34+5:302015-10-30T23:11:21+5:30
दलबदलूंना धडा शिकवा : माने

उमेश शेट्येंकडून पालिकेची फसवणूक : कीर
रत्नागिरी : खोटे-नाटे प्रकार करून, खोटे दस्तऐवज बनवून उमेश शेट्ये यांनी पालिकेचीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कृष्णा रेसिडेन्सी या केतन शेट्ये या मुलाच्या नावावर असलेल्या पालिका क्षेत्रातील १३०३ क्रमांकाच्या इमारत पूर्णत्त्वाचा खोटा दाखला जोडून उमेश शेट्ये यांनी पालिकेची फसवणूक केली आहे. त्यासाठी दिलेला जावक क्रमांक हा पालिकेने वेगळ्याच संस्थेला दिल्याची कागदपत्र निष्पन्न झाली असून, पालिकेची व लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केल्याची माहिती नगरसेवक मिलिंद कीर यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील तेली आळीमधील कृष्णा रेसिडेन्सी या १३०३ क्रमांकाच्या अपार्टमेंट पूर्णत्त्वाचा दाखला रत्नागिरी नगरपरिषदेच्या जावक नोंदणी रजिस्टरमधील जा. क्र. १९८२ /३०/६/२०१० या तारखेने दिलेला आहे, असे विकासकाने खरेदी - विक्री व्यवहारांमध्ये जोडलेल्या दाखल्यात नमूद केले आहे. मात्र, जावक रजिस्टरची सत्यप्रत पाहिल्यानंतर जावक रजिस्टरला १९८२ /३०/६/२०१० या तारखेने व जावक क्रमांकाने कृष्णा रेसिडेन्सीला इमारत पूर्णत्त्वाचा कोणताही दाखला दिलेला नाही. तर या नंबरने सहाय्यक संशोधन अधिकारी, दक्षता व जल नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रयोगशाळा अशी नोंद जावक रजिस्टरमध्ये आहे. त्यामुळे शेट्ये यांनी त्यांच्या मुलाच्या इमारतीच्या पूर्णत्त्वाचा दाखला बनावटरित्या तयार करून घेतला व पालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती मिलिंद कीर यांनी दिली. (प्रतिनिधी)
दलबदलूंना धडा शिकवा : माने
रत्नागिरी : आमदार उदय सामंत व उमेश शेट्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यात मिलिभगत आहे. त्यामुळे रत्नागिरीकरानी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशा बेईमान, पक्षबदलूंना जनतेनेच धडा शिकवावा, असे आवाहन भाजपचे माजी आमदार, प्रदेश प्रवक्ते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केले.
रत्नागिरीत चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचाराला रत्नागिरीत दाखल झाले आहेत. मात्र, भाजप उमेदवारांचे प्रचार अत्यंत शांतपणे सुरू आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज माने यांनी भाजपची भूमिकाही स्पष्टपणे जनतेसमोर मांडली. ते म्हणाले, आमदार सामंत हे जसे पक्षबदलू आहेत, गद्दारीचे शिलेदार आहेत तसेच उमेश शेट्येही पक्षबदलू आहेत. आज दोन वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून जनतेसमोर मतांचा जोगवा मागत आहेत. स्वत:च्या पक्षाशी गद्दारी करणारे जनतेचा केव्हाही विश्वासघात करू शकतील. त्यामुळे या गद्दारी करणाऱ्यांच्या आश्वासनांना दूर सारून रत्नागिरीकरांनी भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करावे, असे माने म्हणाले.
उमेश शेट्ये हे प्रचार करताना एक मत मला एक शिवसेनेला असे सांगत सुटले आहेत. त्यामुळे भाजपचे प्रामाणिक उमेदवार विरुध्द अप्रामाणिक कार्यकर्ते यांच्यातील ही लढाई आहे. रत्नागिरीसारख्या नररत्नांची खाण असलेल्या व चांगला वारसा असलेल्या प्रदेशाला पक्षबदलूपणाचा वारसा देऊन बदनाम करणाऱ्या या गद्दारांना रत्नागिरीकरांनी त्यांच्या उमेदवारांना पराभूत करून धडा शिकवावा.(प्रतिनिधी)