उकाडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:49+5:302021-04-11T04:31:49+5:30

रत्नागिरी : दिवसेंदिवस उकाड्याचा त्रास होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या तापमानाचा पारा अधिकाधिक चढू लागला आहे. त्यामुळे ...

Ukada grew | उकाडा वाढला

उकाडा वाढला

रत्नागिरी : दिवसेंदिवस उकाड्याचा त्रास होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या तापमानाचा पारा अधिकाधिक चढू लागला आहे. त्यामुळे उश्म्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. घामाच्या धारा असह्य होऊ लागल्या असल्याने नागरिकांना शीतपेयाचा आधार घ्यावा लागत आहे.

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

देवरूख : चिपळूण, तसेच संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या महिन्यापासून कुचांबे, कुंभारखणी, आरवली, माखजन आदी भागात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्लास्टीक पिशव्यांची विक्री

रत्नागिरी : रत्नागिरीसह महाराष्ट्रात प्लास्टीक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. कमी मायक्रोच्या पिशव्या विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील काही व्यावसायिकांकडून कमी जाडीच्या पिशव्या वापरल्या जात असून, त्यावर व्यावसायिकांकडून स्वत:चे नाव आणि दुकानाचे नाव घालून दिले जात आहे.

भरपाईची मागणी

खेड : अवकाळी पावसाने तालुक्यातील आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात झालेल्या या पावसाने मोठेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी किटकनाशके, खते मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. मात्र, तरीही मोहर आणि फळे गळून पडली आहेत. त्यामुळे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

कचऱ्याकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : शहरातील ओसवालनगर भागातील कचराकुंडी उचलण्यात आली असतानाही, परिसरातील नागरिक कचरा टाकत आहेत. मात्र, त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारत असल्याने हा कचरा इतस्तत: पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे.

खुलेआम गुटखा विक्री

रत्नागिरी : राज्यात उत्पादन व विक्रीला बंदी असतानाही गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तेथील टपऱ्यांवरही गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासनाने बंदी आणली, तरी त्याचा उपयोग काय, असा प्रश्न ग्रामीण भागातून विचारला जात आहे.

मोकाट श्वानांचा उपद्रव

रत्नागिरी : शहरातील टी.आर.पी., साळवीस्टाॅप, सन्मित्रनगर व अन्य भागांमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणेही धोकादायक बनले. वाहनांचाही श्वान पाठलाग करतात. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

इंटरनेट सेवेचा बोजवारा

आवाशी : खेड शहरासह ग्रामीण भागात सध्या बीएसएनएल कंपनीच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेट सेवा कोलमडली असल्याने, शासकीय कार्यालयासह बँकांमधील कामकाज विस्कळीत झाले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

संमिश्र वातावरणाचा त्रास

रत्नागिरी : सध्या मळभ तर मध्येच कडाक्याचे ऊन असे वातावरण सुरू झाले आहे. या संमिश्र वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या वातावरणामुळे उष्णतेच्या विकारांबरोबरच सर्दी, तापसरी, डोकेदुखी, पित्ताचा त्रास सुरू झाला आहे.

विनापरवाना वाळू उपसा

दापोली : तालुक्यात बेकायदा वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील पांगारी भागातही सध्या बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही.

Web Title: Ukada grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.