उदय सामंत शिवसेनेतून रिंगणात
By Admin | Updated: September 28, 2014 00:21 IST2014-09-28T00:21:18+5:302014-09-28T00:21:18+5:30
राष्ट्रवादीतर्फे मुर्तुझा तर कॉँग्रेसचे कीर यांचेही उमेदवारी अर्ज दाखल

उदय सामंत शिवसेनेतून रिंगणात
रत्नागिरी : राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले उदय सामंत यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत मिरवणूकीने जात विधानसभेसाठी रत्नागिरी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दाखल केला. मराठा मैदान ते नगरपालिकेपर्यंत मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मिरवणूकीत हजारो शिवसैनिक व राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने नामनिर्देशने दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरू होती. काल रात्री उशिराने कॉँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्याने आज या पक्षांच्या उमेदवारांची उपविभागीय कार्यालयात धावाधाव सुरू असताना दिसून येत होती.
उदय सामंत सेनेत गेल्याने राष्ट्रवादीतर्फे बशीर मुर्तुझा यांनी तर आघाडी तुटल्याने कॉँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या दोन्ही नेत्यांबरोबर मोजकेच कार्यकर्ते अर्ज दाखल करताना उपस्थित होते. उपविभागीय कार्यालयाच्या आवारात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गोंधळलेल्या स्थितीत वावरताना दिसून येत होते.
२५ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपाचे बाळ माने यांनी त्यावेळी एबी फॉर्म दाखल केला नव्हता. त्यानंतर २६ रोजी भाजपातर्फे अॅड. बाबासाहेब परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाची उमेदवारी नक्की कोणाला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र हा संभ्रम मिटला असून आज (शनिवार) दुपारी भाजपतर्फे बाळ माने यांचा एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आता सेनेचे उदय सामंत व भाजपाचे बाळ माने यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)