तिहेरी अपघातात म्हाप्रळचे दोघे ठार
By Admin | Updated: July 14, 2016 00:38 IST2016-07-14T00:36:52+5:302016-07-14T00:38:14+5:30
माणगाव येथील दुर्घटना : कारची कंटेनरला जोरदार धडक

तिहेरी अपघातात म्हाप्रळचे दोघे ठार
मंडणगड : माणगाव (रायगड) येथून वैद्यकीय उपचार करून म्हाप्रळ येथे परतीचा प्रवास करणाऱ्या हुसेन इब्राहीम मुकादम (वय ७0) यांच्या स्वीफ्ट कारने एस.टीलला ओव्हर टेक करताना मुंबईहून येणाऱ्या कंटेनरला जोराची धडक दिली. या अपघातात हुसेन यांच्यासह त्यांची भाची आयेशा मुकादम (६0) जागीच ठार झाली. यात हुसेन यांची बहीण कुशीद अब्दुल्ला मुकादम (८0) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर, एसटीला रस्त्याच्या बाजूच्या गटारात किरकोळ अपघात झाला. बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास लोणोरे रेपोशी फाटा येथे हा अपघात घडला.
कुशीद मुकादम यांच्यावर प्रथम माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. या अपघातासंदर्भात माणगाव पोलिसस्थानकातून व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, हुसेन मुकादम स्वीफ्ट डिझायर (एमएच ०८ बी २५०९) गाडीने बहीण व भाचीसमवेत माणगाव येथे आपल्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी गेले होते. तेथील कामे आटोपून माणगाव येथून म्हाप्रळकडे परतीचा प्रवास करीत होते. सकाळी ८.३० च्या दरम्यान लोणेरे रोपोली फाटा येथे दापोली-मुंबई एसटीला (एमएच २० बीएल ३२६७) ओव्हरटेक करून मुंबईकडून गोव्याला जात असलेल्या कंटेनरला मुकादम यांच्या कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात हुसेन मुकादम, आयेशा मुकादम जाग्यावरच गतप्राण झाले, तर मुकादम यांची बहीण कुशीद या गंभीर जखमी झाल्या. गोरेगाव पोलिस स्थानकात दापोली-मुंबई गाडीचे वाहक अमित नंदकुमार साळवी (खेर्डी, दापोली) यांनी फिर्याद नोंदवली आहे. अधिक तपास पोलिस नाईक संतोष वळंजू करीत आहेत. (प्रतिनिधी)