आणखी दोन सर्व्हर पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST2021-08-21T04:37:01+5:302021-08-21T04:37:01+5:30
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय कॉलिंग प्रकरणात संशयित आरोपींनी समाधानकारक माहिती दिली नसली तरी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेल्या यंत्रणेमुळे मुंबईतील आणखी दोन ...

आणखी दोन सर्व्हर पोलिसांच्या हाती
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय कॉलिंग प्रकरणात संशयित आरोपींनी समाधानकारक माहिती दिली नसली तरी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेल्या यंत्रणेमुळे मुंबईतील आणखी दोन सर्व्हर पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्व्हरचा उपयोग आंतरराष्ट्रीय कॉलिंगसाठी झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे.
रत्नागिरी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरप्रकरणी शुक्रवारी पनवेल येथे दोन ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीमध्ये पोलिसांना संगणकासह अन्य काही साहित्य हाती लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी गती येणार आहे.
रत्नागिरीतून बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल केले असल्याची माहिती मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाकडून मिळाल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. यातील मुख्य सूत्रधार फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याने पनवेल येथे दोन कॉल सेंटर उभारल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली होती. त्याने दिलेले पत्ते चुकीचे असल्याचे तपासात लक्षात आले. मात्र रत्नागिरी पोलिसांनी आपली यंत्रणा वापरुन पनवेल येथे अशी यंत्रणा चालविणाऱ्याची चौकशी सुरू केली आहे.
पनवेलमधील या सर्व्हरचा रत्नागिरीशी काही संबंध आहे का, त्या सर्व्हरवरुनही आंतरराष्ट्रीय कॉल झाले आहेत का, अशा प्रश्नांची उत्तरे आता शोधत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचाही शोध पोलीस घेत आहेत. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज गिरी, रत्नागिरी दहशतवादविरोधी पथक, पनवेल पोलीस व रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.