रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाखांची वृक्षलागवड
By Admin | Updated: July 6, 2016 00:34 IST2016-07-05T23:30:52+5:302016-07-06T00:34:01+5:30
शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती : सामाजिक संस्थांचाही उल्लेखनीय सहभाग

रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाखांची वृक्षलागवड
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असतानाच रत्नागिरी जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, किंबहुना अधिकच वृक्षलागवड करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांच्यातर्फे जिल्ह्यात २ लाख ४ हजार ९७५ वृक्षलागवड पूर्ण करण्यात आली आहे.
सुरुवातीला जिल्ह्यास १ लाख ६४ हजार १८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आॅनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ४७९ वृक्षलागवडचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले.
आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ८६ हजार ५५० झाडे लावण्यात आली आहेत, तर आॅफलाईन पद्धतीने १८ हजार ४२५ झाडे लावण्यात आली. जिल्हाभरात एकूण २ लाख ४ हजार ९७५ झाडांची लागवड करण्यात आली. त्यासाठी १ लाख ५३ हजार ५२ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
संपूर्ण जिल्हाभरात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३१ हजार ८४८ झाडे लावण्यात आली. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात २६ हजार ३४५, लांजा तालुक्यात २४ हजार ७०१ वृक्षलागवड करण्यात आली. अनेक व्यक्ती झाडे लावण्यासाठी स्वत:हून पुढे आल्या आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी तर कुंड्यांमध्ये झाडे
लावली.
विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीदेखील वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आॅनलाईन पद्धतीने लागवडीचा डेटा ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे आॅफलाईन पद्धतीने लागवड करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. संगमेश्वर तालुकावगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये आॅफलाईन लागवड करण्यात आली. अन्य तालुक्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवडीचा हा उपक्रम अजूनही सुरुच आहे. (प्रतिनिधी)
वृक्षलागवडीचे हे शिवधनुष्य विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी संस्था, स्थानिक ग्रामस्थ तसेच नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे पेलले. त्यामुळेच जिल्ेह्यात १०० टक्के वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.