सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात दोन ठार
By Admin | Updated: March 2, 2016 23:58 IST2016-03-02T23:03:02+5:302016-03-02T23:58:52+5:30
गुहागर हादरले : रत्नागिरी गॅस कंपनीतील थरार; पत्नीसह हल्लेखोरही जखमी

सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात दोन ठार
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील एका सुरक्षारक्षकाने आपल्या दोन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केले. घटनास्थळी आलेल्या आपल्या गरोदर पत्नीवर गोळी झाडून त्याने स्वत:लाही गोळी मारून घेतली. छातीतून गोळी आरपार झालेले पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यामुळे तालुका हादरला आहे. सहकाऱ्यांकडून होणारा जाच आणि त्याकडे वरिष्ठांचे होत असलेले दुर्लक्ष या मानसिक दबावाखाली आपण हे कृत्य केल्याचे या सुरक्षारक्षकाने पोलिसांना सांगितले आहे.
रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सीआयएसएफचा (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) सुरक्षारक्षक हरीशकुमार गौड (रा. जबलपूर, जि. नरसिंहपूर, मध्य प्रदेश) याने हा गोळाबार केला आहे. याच सुरक्षा कंपनीचे सहायक पोलीस फौजदार मेजर बाळू गणपती शिंदे (मळणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) व कॉन्स्टेबल रणीश पी. आर. (चिनोली, केरळ) हे दोघेजण यात ठार झाले आहेत.
हरीशकुमार आणि त्याची पत्नी प्रियांका या दोघांनाही चिपळूण येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात
आले आहे.
हल्लेखोर हरीशकुमार गौड हा मंगळवारी दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंतची ड्यूटी संपवून प्रवेशद्वाराजवळील कार्यालयात आपली रायफल जमा करण्यासाठी आला होता. यावेळी रणीश पी. आर. या सुरक्षारक्षकाशी त्याचा वाद झाला. या वादातून त्याने पहिल्यांदा गोळीबार केला. त्याचा आवाज ऐकून मेजर बाळू शिंदे हे जवळील गार्ड होस्टेलमधून बाहेर आले व त्यांनी हरीशकुमारला रोखण्याचा प्रयत्न केला. हरीशकुमारने त्यांच्यावरही गोळी झाडली. यासाठी त्याने इन्सास रायफलचा वापर करून सहा गोळ्या फायर केल्या.
दोन सहकारी सुरक्षारक्षकांवर गोळ्या झाडल्यानंतर हरीशकुमार याने गार्ड होस्टेल (या रक्षकांचे राहण्याचे ठिकाण जे कंपनी मेनगेट व वॉटर गेट यांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे) येथे एका खोलीत स्वत:ला बंद करून घेतले. अन्य सुरक्षारक्षक लगेचच आसपास गोळा झाले; मात्र त्याच्याकडे रायफल असल्याने कोणीही पुढे जात नव्हते. त्याने शांत व्हावे, पुन्हा गोळीबार करू नये म्हणून त्याची पत्नी प्रियांकाला या खोलीकडे पाठविण्यात आले. या दरम्यान, तब्बल दोन तास निघून गेले होते. धाडस करून पतीला समजाविण्याचा प्रयत्न पत्नीच्याच अंगाशी आला. हरीशकुमारच्या हातातील बंदुकीची गोळी तिच्या छातीत घुसली. गंभीर जखमी होऊन ती खाली कोसळली. पत्नी कोसळलेली पाहताच भांबावलेल्या हरीशकुमारने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. त्यामुळे तोही जखमी झाला. तातडीने दोघांनाही चिपळूण येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. याबाबत गुहागर पोलिसांना कंपनीकडून खबर मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक खेड व चिपळूणचा प्रभारी पदभार काम पाहणारे चिन्मय पंडित गुहागरमध्ये असून, या घटनेचा कसून आढावा घेत आहेत. याबाबत कंपनीकडून बलवंत सिंग यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
सहकाऱ्यांकडून होणारा जाच
सहकाऱ्यांकडून आपला सतत जाच केला जात होता. पत्नीवरून आपली चेष्टा केली जात होती. त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद घेतली जात नव्हती. या साऱ्या मानसिक दबावाला कंटाळून आपण हे कृत्य केले असल्याचे हरीशकुमार याने बुधवारी रुग्णालयात सांगितले. (सविस्तर वृत्त हॅलो १)
गर्भवती पत्नीला पुढे केले कोणी?
आपल्या दोन सहकाऱ्यांना मारून जेव्हा हरीशकुमार रुममध्ये लपला तेव्हा पत्नीला त्याच्याजवळ पाठविण्याचा निर्णय हा सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी घेतला की, पोलिसांनी घेतला याबाबतचे गूढ कायम आहे. पत्नी प्रियांका ही नऊ महिन्यांची गर्भवती आहे.
हरीशकुमार व रणीश पी. आर. यांच्यामध्ये याआधीही वाद झाला होता व या वादातून गोळ्या झाडल्याची चर्चा सुरू आहे. जखमी हरीशकुमार जेव्हा अतिदक्षता विभागातून बाहेर येईल, तेव्हाच या घटनेमागील नक्की कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
जवान शिंदे यांच्या मृत्यूने मळणगाववर शोककळा
शिरढोण (जि. सांगली) : बाळासाहेब शिंदे मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील रहिवासी असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण मळणगाव येथे, तर माध्यमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. प्रतिकूल परिस्थितीतून वयाच्या विसाव्या वर्षी ते सीआयएसएफमध्ये दाखल झाले. गुहागर येथे गेली दोन वर्षे वरिष्ठ अधिकारी म्हणून शिंदे कार्यरत होते. अतिशय मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते परिचित होते. गेली अडतीस वर्षे ते सेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, दोन मुले असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचे वृत्त बुधवारी सकाळी सातच्या सुमारास पोहोचताच मळणगावात शोककळा पसरली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले. शिंदे यांच्या निवासस्थानी गावकऱ्यांनी गर्दी केली. त्यांच्या अमित व प्रमोद या मुलांचा जनसंपर्क मोठा आहे. (वार्ताहर)