कंटेनर-मॅक्सिमो अपघातात दोन ठार, पाच जखमी

By Admin | Updated: July 31, 2014 23:26 IST2014-07-31T23:19:27+5:302014-07-31T23:26:01+5:30

माय-लेकाचा समावेश : वेरळ घाटातील दुर्घटना

Two killed and 5 wounded in container-Maximo crash | कंटेनर-मॅक्सिमो अपघातात दोन ठार, पाच जखमी

कंटेनर-मॅक्सिमो अपघातात दोन ठार, पाच जखमी

लांजा : राजापूर गंगेच्या दर्शनासाठी गुहागर पालशेतहून निघालेल्या भाविकांच्या टाटा मॅक्सिमो गाडीला कंटेनरने दिलेल्या धडकेत माय-लेक जागीच ठार झाले. या भीषण अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात वेरळ घाटामध्ये आज, गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. मृतांमध्ये आशा प्रमोद अडूरकर, दुर्वास अडूरकर यांचा समावेश आहे.
गुहागर पालशेत येथील तोडणकर कुटुंबीय देवदर्शनासाठी टाटा मॅक्सिमो गाडी (एमएच ०४ इएक्स २९२०) घेऊन सकाळीच घराबाहेर पडले. प्रथम मार्लेश्वर येथे दर्शन घेऊन ते पालीमार्गे राजापूर येथील गंगेचे दर्शन घेण्यासाठी निघाले. १०.४५ वाजण्याच्या दरम्यान वेरळ बस स्टॉपनजीक डिझेल संपून त्यांची गाडी बंद पडली. सोबत आणलेले डिझेल भरून गाडी वेरळ घाट चढून पुढे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने मॅक्सिमोला धडक दिली.कंटेनरचा वेग आणि वजन यामुळे मॅक्सिमो फरफटत जाऊन रस्त्यालगतच्या दरडीवर चेपली गेली. कंटेनर मॅक्सिमो गाडीवर कलंडला. कंटेनरच्या मागील बाजूने मॅक्सिमो गाडी पूर्णत: अडकून पडली. त्यामुळे आशा प्रमोद अडूरकर (वय ३५) आणि त्यांचा मुलगा दुर्वास (१२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर लगेचच महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी अपघाताची माहिती लांजा पोलिसांना दिली. तोपर्यंत महामार्गावर थांबलेले वाहनचालक व प्रवासी यांनी गाडीतील मृणाली महेश तोडणकर (४२), महेश भिकाजी तोडणकर (४४), जितेंद्र भिकाजी असगोलकर (४०), संजय शांताराम कदम, चालक रवींद्र बाळ आग्रे यांना बाहेर काढले.
गंभीर जखमी झालेल्या पाचही जणांना लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.तत्पूूर्वी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, या अपघातामुळे थांबलेल्या वाहनांमधील प्रवासी यांनी गाडीत अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्नकेला. हातखंबा येथील वाहतूक पोलिसांनी क्रेन आणून महिलेला बाहेर काढले. त्याचपद्धतीने दुर्दैवी दुर्वासलाही बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक किसनसिंग लालसिंग (४०, खेडी-राजस्थान) हा पळून गेला होता. त्याला वेरळ येथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. अपघातानंतर एका बाजूने वाहतूक चालू होती. मात्र, कंटेनर काढण्यासाठी आलेल्या क्रेनमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Two killed and 5 wounded in container-Maximo crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.