अपघातांत दोन ठार, सहा गंभीर
By Admin | Updated: May 17, 2015 01:33 IST2015-05-17T01:33:02+5:302015-05-17T01:33:02+5:30
पाच दुर्घटना : मृतांमध्ये एक सांगलीचा, तर दुसरा पीरलोटेचा

अपघातांत दोन ठार, सहा गंभीर
रत्नागिरी / आवाशी : रत्नागिरी, लांजा आणि खेड तालुक्यांत झालेल्या पाच वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विश्वास वसंत गुरव (वय २६, टेंबे, तासगाव, सांगली) आणि अमर अनंत जोईल (२५, पीरलोटे, ता. खेड) या दोघांचा समावेश आहे.
रत्नागिरी तालुक्यात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विश्वास वसंत गुरव (२६, टेंबे, तासगाव) हा स्कॉर्पिओ (एमएच०९ बीएक्स ९५०९) घेऊन सांगलीहून गणपतीपुळ्याच्या दिशेने निघाला होता. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गाडी गणपतीपुळे मार्गावरील जाकादेवी येथे आली असताना दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना गुरव याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडली. यात गुरव याचा जागीच मृत्यू झाला. याच गाडीतील सुचिकेत वसंत मोरे (१५) व संदीप माणिक बुचके (२०, दोघेही रा. खानापूर, सांगली) हे गंभीर जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर पीरलोटे येथे शुक्रवारी मध्यरात्री १२.३0 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने पिकअप जीपला धडक दिल्याने पिकअप चालक अमर जोईल जागीच ठार झाला. अमर कामानिमित्त पिकअप जीप घेऊन चिपळूण येथे गेला होता. त्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात अमरचा जागीच मृत्यू झाला.
अन्य एका अपघातात रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने जाणाऱ्या डंपरसमोर (एमएच ०८ डब्ल्यू ९७९९) गाय आल्याने डंपरचालकाने अचानक गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी मागून रमेश नेमाराम चौधरी (वय २५, खेर्डी, चिपळूण) हे आपली पत्नी देविका चौधरी (२४) हिच्यासह दुचाकीवरून चिपळूणहून लांजाच्या दिशेने चालले होते. डंपरचा वेग कमी झाल्याने चौधरींनी दुचाकीचा वेग कमी केला.
त्याचवेळी भरधाव वेगाने मुंबई ते गोवा जाणाऱ्या इनोव्हा कारची (एमएच ४८ एस ७६५१) दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात चौधरी पती-पत्नी दोघेही जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खानू-मठ येथे घडला.
लांजा तालुक्यातील आसगे येथे शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला अपघात होऊन दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींची नांवे राजू रमण सरकार (वय ४५, भटवाडी, लांजा) व नीलेश नामदेव लांजेकर (३२, वैभव वसाहत, लांजा) अशी नावे आहेत.
गोवा ते दिल्ली असा कोलगेटची वाहतूक करणारा ट्रक (एचआर ५५ के ७११०) रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात शनिवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कापडगाव (ता. रत्नागिरी) येथे झाला.
(शहर वार्ताहर)