भात उत्पादनवाढीस दोन कोटी मंजूर

By Admin | Updated: June 22, 2014 01:40 IST2014-06-22T01:33:01+5:302014-06-22T01:40:58+5:30

राष्ट्रीय विकास कार्यक्रम : अन्नसुरक्षेसाठी पोषक उपक्रम

Two Crore Growth to Rise in Growth | भात उत्पादनवाढीस दोन कोटी मंजूर

भात उत्पादनवाढीस दोन कोटी मंजूर

रत्नागिरी : अन्न सुरक्षा योजनेत कमी दरात तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी भातपिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने २०१४-१५ पासून पीक विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. या कार्यक्रमांतर्गत भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
भात पिकाकरता प्रत्येकी १०० हेक्टरचे २१ प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. ९० हेक्टर सुधारित प्रकल्प, १० हेक्टर क्षेत्र संकरित बियाणांसाठी असेल. एका हेक्टरसाठी साडेसात हजार रूपये उपलब्ध होणार आहेत. त्यातून पीक प्रात्यक्षिके, बहुपीक मळणीयंत्र, ड्रम सिडर, पेरणी यंत्र, पाणी योजना राबविण्यासाठी पंपसेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातील भात उत्पादन हे उपअभियान आहे. ते ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या आठ जिल्ह्यांसाठी २० कोटी रूपये दिले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ७० हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेण्यात येते. मात्र अद्याप पारंपरिक पध्दतीचा वापर करूनच भात लागवड सुरू आहे. जिल्ह्याचे हेक्टरी उत्पादन २९ क्विंटल आहे. अद्याप पारंपरिक बियाणांचा वापर करण्यात येत आहे. कृषी विद्यापिठाने शिफारस केलेल्या अनेक संकरीत, सुधारीत बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत हेक्टरी २९ क्विंटल असलेले उत्पन्न ४५ क्विंटलपर्यत वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत कमी उत्पादकता असलेल्या भाताच्या प्लॉटची निवड करण्यात येणार आहे. विद्यापिठाने सूचित केलेली बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, कृषि अधिकाऱ्यांकडून सतत पाहणी करण्यात यावी व अन्य शेतकऱ्यांना ती प्रात्यक्षिके पाहता यावीत, यासाठी सहलींचे नियोजन कृषी विभागाने करावे, यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Two Crore Growth to Rise in Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.