पिसाळलेल्या गायीचा दोघांवर हल्ला

By Admin | Updated: July 4, 2014 00:17 IST2014-07-04T00:17:10+5:302014-07-04T00:17:42+5:30

खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत

The two cows attacked | पिसाळलेल्या गायीचा दोघांवर हल्ला

पिसाळलेल्या गायीचा दोघांवर हल्ला

रत्नागिरी : श्वानदंशामुळे पिसाळलेल्या गायीने शहरातील साळवी स्टॉपपासून आरोग्य मंदिरपर्यंत हल्लाबोल करत चार दुचाकींचे मोठे नुकसान केले. यामध्ये जखमी झालेले दोघेजण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. भरपावसात संध्याकाळी ४ वाजता सुरु झालेल्या हल्लाबोलमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा नजरेसमोर आला आहे. रस्त्यालगत फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर जगणाऱ्या एका गायीचा साळवी स्टॉप येथे मोकाट कुत्र्याने चावा घेतला. यामुळे गाय पिसाळल्याने सैरावैरा पळू लागली. १० मिनिटांनंतर गाईने राँग साईडने येणाऱ्या दुचाकीचा पाठलाग करत आरोग्य मंदिरकडे धाव घेतली. गायीपासून स्वत:ला वाचवण्याच्या नादात स्वाराने गाडीवरुन उडी मारुन पळ काढला. मार्गात आलेली गाडी शिंगाने उडवून देत ती आरोग्यमंदिरकडे धावत सुटली. तेथील ओमश्री अपार्टमेंटच्या मुख्य लोखंडी गेटवरुन उंच उडी मारत ती गाय अपार्टमेंटच्या आवारात शिरली. गेटलगत असणाऱ्या दुकानदारांनी मागोमाग गेटजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच वेगाने धावत मागे येऊन गेटवर धडक दिली. धडकेने गेट उघडले गेले. येथून थेट रस्त्यावर आलेल्या त्या गायीने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात दोन मोटरसायकलस्वार जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या गायीने या ठिकाणी उभ्या असलेल्या अन्य दोन गाड्यांना धडका देत त्यांचेही नुकसान केले. यानंतर दुभाजकावरुन उडी मारुन शेजारच्या गल्लीत धावत गेली. ती गेल्याचे पाहून परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. (प्रतिनिधी)

Web Title: The two cows attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.