अडीच लाख मतदार देणार कौल
By Admin | Updated: October 14, 2014 23:23 IST2014-10-14T21:59:02+5:302014-10-14T23:23:43+5:30
चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज

अडीच लाख मतदार देणार कौल
चिपळूण : विधानसभा निवडणुकीसाठीची प्रचाराची रणधुमाळी संपली असून, आता प्रत्यक्ष मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघात अडीच लाख मतदार उद्या आपला कौल देतील. हा मतदारसंघ चिपळूण व संगमेश्वर या दोन मतदारसंघात विभागला गेला आहे. २६५ चिपळूण - संगमेश्वर मतदार संघात एकूण २३५ गावे असून, ३१८ मतदान केंद्र आहेत. प्रत्यक्षात संगमेश्वर तालुक्यातील गोठणे या पुनर्वसित गावात मतदान होणार नसल्याने तेथील मतदार हातीव केंद्रावर मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ३१७ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातील २० मतदानकेंद्र संवेदनशील आहेत. ३१७ मतदानयंत्र आज (मंगळवारी) संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचली आहेत. आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे यांनी तिसरे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. ३२ मतदानयंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत. गुरुदक्षिणा सभागृहातील ३७ खोल्यांमधून साहित्य देण्यात आले. त्यासाठी ३९ एस. टी. बसेस, २४ शासकीय वाहने, ३६ खासगी वाहने दिमतीला होती. उद्या (दि. १५) मतदान संपल्यानंतर रात्री पुन्हा सर्व यंत्र गुरुदक्षिणा सभागृहात आणण्यात येतील. दि. १९ रोजी १४ टेबलांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. २३ फेऱ्यांत ही मोजणी होईल. प्रत्यक्ष मतदानापूर्वी चाचणी होणार आहे.
चिपळूण तालुक्यातील ९१, तर संगमेश्वर तालुक्यातील १४४ गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. चिपळूण मतदार संघात १५७, तर देवरुख मतदार संघात १६१ मतदान केंद्र आहेत. या मतदार संघात चिपळूण तालुक्यातील ६७ हजार ५२६ पुरुष, तर ६६ हजार ८०८ महिला मतदार मिळून १ लाख ३४ हजार ३३४ मतदार आहेत. संगमेश्वर तालुक्यात ५४ हजार ५९४ पुरुष, तर ६० हजार ७९५ महिला मतदार मिळून एकूण १ लाख १५ हजार ३८९ मतदार आहेत. दोन्ही मिळून या मतदार संघात २ लाख ४९ हजार ७२३ मतदार आहेत. मतदार संघात ५ हजार ४८३ महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील निकालावर महिलांचे वर्चस्व राहणार आहे.
चिपळूण - संगमेश्वर मतदार संघातील ४४ मतदान केंद्र शहरी भागात आहेत. २७४ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. या मतदार संघात ४३० झोनल आॅफिसर, सहाय्यक झोनल आॅफिसर व प्रिसायडिंग आॅफिसर कार्यरत आहेत. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची फिरती पथकेही आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभतेने हाताळली जाणार आहे. (प्रतिनिधी)
चिपळूण
एकूण मतदार २,४९,७२३
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवार
नाव पक्ष शेखर निकमराष्ट्रवादी--सदानंद चव्हाणशिवसेना--सुशांत जाधवरिपाइं --प्रेमदास गमरेबसपा--माधव गवळीभाजप
यशवंत तांबेरिपाइं--गोपीनाथ झेपलेअपक्ष--उमेश पवारबहुजन मु. पार्टी--संतोष गुरवअपक्ष--रश्मी कदमकाँग्रेस
२ लाख ४९ हजार ७२३ मतदार करणार उद्या मतदान.
मतदारसंघात चिपळूणमधील ९१, तर संगमेश्वरमधील १४४ गावांचा समावेश.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज.
२३ फेऱ्यात होणार मतमोजणी.
मतदानापूर्वी घेतली जाणार मतदानयंत्रांची चाचणी.
मतदानाच्या दिवशी फिरती पथके घालणार गस्त.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज.
लांजात ३३२ मतदान केंद्रांवर ११२८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
खेड तालुक्यात १४ मतदान केंद्र संवेदनशील