नगर परिषदेचे अडीच कोटी परत जाऊ नयेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST2021-03-17T04:32:56+5:302021-03-17T04:32:56+5:30
चिपळूण : शहरातील स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्यासाठी मंजूर झालेला सुमारे अडीच कोटींचा निधी मार्चअखेर खर्च न पडल्यास ...

नगर परिषदेचे अडीच कोटी परत जाऊ नयेत
चिपळूण : शहरातील स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्यासाठी मंजूर झालेला सुमारे अडीच कोटींचा निधी मार्चअखेर खर्च न पडल्यास परत जाणार आहे. त्यामुळे हे काम लवकर मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका रसिका देवळेकर यांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे मंगळवारी एका पत्राद्वारे केली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्ता महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या रस्त्यामुळे नवीन बायपास रस्ता तयार होणार आहे. या रस्त्यासाठी जिल्हा नियोजनकडून अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, हा निधी तातडीने खर्च होणे गरजेचे आहे. तसेच या रस्त्यावरील मोरींची कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. स्वामी मठ रस्त्याच्या बाजूला गटार खोदून ठेवल्याने तेथे असलेल्या गाळेधारकांना त्याचा त्रास होत आहे. पवन तलाव मैदानावरील खोदलेल्या गटाराचाही खेळाडूंना त्रास होतो. यावरही लवकरच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तसेच चिपळूणचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत भैरी परिसरातील रस्ते खराब झालेले आहेत. तेही पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
हॉटेल जिप्सीपासून ते होळीपर्यंत रस्ता हा वाढत्या रहदारीच्या दृष्टीने १२ मीटरचा होणे आवश्यक असल्याची मागणीही देवळेकर यांनी केली आहे.