बारा हजार कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: April 16, 2015 00:02 IST2015-04-15T23:14:39+5:302015-04-16T00:02:44+5:30

जिल्हा परिषद : आर्थिक वर्षअखेरचा फटका यंदाही

Twelve thousand employees are waiting for the wage | बारा हजार कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

बारा हजार कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : शासनाकडून अनुदान येण्यास विलंब झाल्याने जिल्हा परिषदेचे सुमारे १२ हजार कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले आहेत़ एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा सुरु झाला तरी मार्च महिन्याचे वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे़ मार्च एंडिंगचा फटका प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना बसत असतो़ चालू आर्थिक वर्षातही दरवर्षीप्रमाणे कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अजूनही झालेले नाही़ जिल्ह्याच्या ग्रामीण, डोंगराळ भागामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका काम करीत असतात़ या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे आवश्यक असते़ आज जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर सुमारे १२ हजार कर्मचारी व अधिकारी काम करतात़ त्यामध्ये ८३०० शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांचाही समावेश आहे. तसेच आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक, सेविका आणि इतर कर्मचारी असे एकूण १८०० आणि ग्रामपंचायत विभागाचे ८०० कर्मचारी, वित्त विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, पशुसंवर्धन या विभागातील कर्मचारी अधिकारी असे एकूण सुमारे १२ हजार कर्मचारी आहेत़ या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कुटुंबीय त्यांच्या वेतनावरच अवलंबून असतात़
हजारो शिक्षक, कर्मचारी, अभियंते, अधिकारी हे परजिल्ह्यातील आहेत़ घरभाडे, त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्च व इतर सोयीसुविधा मिळण्यासाठी होणारा खर्च याचा विचार करता वेतन वेळेवर न झाल्यास त्याचे परिणाम खोलवर होतात़ त्यासाठी वेळीच वेतन झाल्यास कर्मचाऱ्यांना घरचा गाडा हाकणे सोयीचे जाते़ मात्र, एप्रिलची १५ तारीख उलटली तरी अद्याप कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन न झाल्याने नाराजी पसरली आहे़अर्धा महिना संपत आला निदान आता तरी वेतन मिळावे, या प्रतिक्षेत १२ हजार कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. (शहर वार्ताहर)

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा होत असल्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून पेन्शन देण्यात येते. मात्र, शासनाकडून अनुदान न आल्याने पेन्शनरही पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Twelve thousand employees are waiting for the wage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.