हळद रोपवाटिका उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:35+5:302021-04-20T04:32:35+5:30
मंडणगड : तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हळद लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या गावातील महिला ...

हळद रोपवाटिका उपक्रम
मंडणगड : तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हळद लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या गावातील महिला बचत गट ५० हजार रोपांची निर्मिती करणार आहे. यामुळे इतर गावांनाही एक वेगळा आदर्श मिळणार आहे.
बस सुरू करण्याची मागणी
आवाशी : दिवाणखवटी सातपानेवाडी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू करण्यात आले आहे. सध्या या मार्गावर एसटी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खवटी, दिवाणखवटी सातपानेवाडीसाठी मिनी एसटी बस सुरू करावी, अशी मागणी या वाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
चाकरमान्यांचे आगमन सुरू
खेड : सध्या मुंबई कोरोनाचा हॉट स्पॉट बनले आहे. त्यामुळे या वातावरणापासून बाहेर पडण्यासाठी मुंबईकर चाकरमानी आपल्या गावी परतू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने बाहेरून येणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली असली तरी, काही चाकरमानी छुप्या मार्गाने आपल्या गावी थेट दाखल होत आहेत.
क्रिकेट क्लबतर्फे उपक्रम
चिपळूण : गोकुळ युवा क्रिकेट क्लब मुंबईतर्फे सुरेखा ब्रीद आणि भूषण चिले यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संजय ब्रीद आणि संदीप भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. यातील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला बक्षिसे देण्यात आली.
रस्त्यांवर शुकशुकाट
लांजा : जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार औषध दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. इतरवेळी ग्राहकांची खरेदीसाठी शहरात गर्दी होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. मात्र आता सर्व दुकाने बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.