‘कोरोनामर्दन’द्वारे वर्तक कुटुंबाची कोविड योद्ध्यांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:26+5:302021-09-11T04:32:26+5:30
रत्नागिरी : भारतातीलच नव्हे तर अवघ्या जगभरातील लोक गेले दीड वर्षे कोरोना संकटाने ग्रासले आहेत. जिल्ह्यातही हजारो व्यक्ती ...

‘कोरोनामर्दन’द्वारे वर्तक कुटुंबाची कोविड योद्ध्यांना मानवंदना
रत्नागिरी : भारतातीलच नव्हे तर अवघ्या जगभरातील लोक गेले दीड वर्षे कोरोना संकटाने ग्रासले आहेत. जिल्ह्यातही हजारो व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून, शेकडो व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गाचा नाश करणारा ‘कोरोनामर्दन बाप्पा’ कुवारबाव येथील संजय वर्तक यांच्या घरी विराजमान झाला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही वर्तक कुटुंबाने इकोफ्रेंडली बाप्पा साकारला आहे.
काेराेनाच्या महामारीमध्ये दररोज हजारो माणसे बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहेत. काेराेनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी डाॅक्टर, परिचारिका, पाेलीस, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक झटत आहेत. या साऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि काेराेनाचा पराभव करण्यासाठी वर्तक कुटुंबाने हा देखावा साकारला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती व देखावा साकारणे ही या कुटुंबाची कल्पकता आहे. दरवर्षी पर्यावरणपूरक गणपती साकारून ते पर्यावरणाविषयीचा संदेशही देत आहेत. हा संपूर्ण देखावा १२ फूट असून तो पुठ्ठे, दोरा, कागद, गव्हाच्या पिठाची चक्की यापासून बनवून त्यावर नाचणी, केळीची पाने यांचा कलात्मक वापर केलेला आहे.
द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्णांनी कालिया नागाचा वध (कालियामर्दन) करून संकटावर मात केली. त्याचप्रमाणे २१ व्या शतकामध्ये जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा नाश करणारा हा कोरोनामर्दन बाप्पा विराजमान झाला आहे. देखाव्याच्या निमित्ताने कोरोना विषाणूच्या भयानक संकटाशी देवदूत बनून लढणारे कोविड योद्धे या सर्वांचे प्रतीकात्मक रूप दाखविणाऱ्या संकटनाशक विघ्नहर्त्याच्या रूपाने सादर करण्यात आले आहे. इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताना गेली तेरा वर्षे ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश वर्तक कुटुंब सातत्याने देत आहेत.