आकेशियाची ‘ती’ झाडे देतात मृत्यूला आमंत्रण
By Admin | Updated: August 3, 2014 22:44 IST2014-08-03T21:20:12+5:302014-08-03T22:44:13+5:30
बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा : राजापूर तालुक्याचा पूर्व विभाग बनतोय धोकादायक

आकेशियाची ‘ती’ झाडे देतात मृत्यूला आमंत्रण
पाचल : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडे आजघडीला प्रवाशांसह वाहनांच्या दुर्घटनेला कारणीभूत ठरत आहेत. चुकीच्या पद्धतीचा वापर करुन केवळ सरकारी पैसा लाटण्याचा प्रकार सध्या बांधकाम खात्यात सुरु झाल्याने खात्याबाबत संताप व्यक्त होत आहे.
बांधकाम खात्याच्या राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली आकेशियाची झाडे आज प्रवाशांना सावलीपेक्षा मृत्यूला आमंत्रण देणारी ठरत आहेत. रस्त्यावरुन वाहतूक करणे किंवा पायी प्रवास करताना रस्त्यावरील डांबरामुळे उष्णतेमुळे डोळ्यांची आग होऊन त्रासाचा प्रवास होवू नये, म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने वनिकरणाच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आहेत. अशाच रस्त्यापैकी ओणी अणुस्कुरा विठापेठ राज्यमार्ग १५० वर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. हा रस्ता राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावाच्या जवळून जातो. मात्र, कोल्हापूर बाजारपेठेशी सर्वांत जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर सतत वर्दळ असते. अशा अतिशय महत्त्वाच्या रस्त्यावर प्रवाशांच्या सावलीसाठी उष्णतेला रोधक बनवण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यानजीक लावलेली आकेशियाची झाडे याच प्रवाशांच्या मृत्यूला आमंत्रण देणारी ठरत आहेत.
उन्हाळ्यात सावली मिळणाऱ्या झाडाचा विस्तार किती झाला आहे. ही झाडे रस्त्यावर किती प्रमाणात झुकली आहेत, याचा सार्वजनिक बांधकाम खात्याने कधीच विचार केलेला नाही.
मुळात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली आकेशियाची झाडे ही विदेशी जात असून, सदाहरीत आहेत. याची पाळे खूप खोल जात नाहीत. त्यामुळे या झाडाचे खोड विस्ताराचा भार सहन करु शकत नाहीत. अशा प्रकारे लावण्यात आलेली ही झाडे रस्त्याच्या बाजूकडे झुकल्याने ती कधीही रस्त्यावर कोसळतात. अशा कोसळणाऱ्या झाडामुळे अनेक अपघात होऊनसुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आलेली नाही.या ओणी-अणुस्कुरा विठापेठ रस्त्यावर २२.५०० अंतरावर उचावळे वळणात एका दरडीवर असलेल्या झाडाचा भरमसाठ विस्तार झाला आहे. मात्र, हे झाड पूर्ण रस्त्याच्या बाजूला झुकले आहे. त्यामुळे हलक्या वाऱ्यातसुद्धा हे झाड रस्त्यावर कधीही कोसळू शकते. ज्या ठिकाणी हे झाड आहे तिथे वळण असल्याने समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसून येत नाही. संभाव्य अपघात टाळण्यासाठी बांधकाम खात्याने योग्य ती खबरदारी घ्यावी. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना ही झुकलेली अपघाताला कारणीभूत ठरणारी झाडे दिसून येत नाहीत याबाबत आश्चर्य आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी ही वस्तुस्थिती दिसून येत आहे. अनावश्यक ठिकाणी झाडे लावल्याने त्याचा वाहनचालकांना त्रास होत असून ती हटवण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)