तंटामुक्त समित्यांमध्ये पारदर्शीपणा आवश्यक
By Admin | Updated: August 11, 2015 00:14 IST2015-08-11T00:14:25+5:302015-08-11T00:14:25+5:30
खेड तालुका : समित्यांच्या काही अध्यक्षांवरच गुन्हे दाखल

तंटामुक्त समित्यांमध्ये पारदर्शीपणा आवश्यक
खेड : गावागावात क्षुल्लक कारणांवरून निर्माण होणारे वाद हे तंट्याचे रूप धारण करतात़ असे तंटे समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली़ हे तंटे सोडविण्यासाठी अनेक गावांमध्ये ही समिती परिश्रम घेत आहे़ मात्र, त्याला मर्यादा पडत आहेत़ अनेक गावातील तंटामुक्त समित्यांचे अध्यक्षच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे उघड झाले आहे. गाव तंटामुक्त होण्यामध्ये अशा अध्यक्षांचा मोठा अडथळा ठरत आहे.़ त्यांना बदलणे आवश्यक झाले असून, पोलिसांनी याकामी पुढाकार घेतल्यास ही मोहीम व्यापक होण्यास मदत होणार आहे़
खेड तालुक्यातील बऱ्याचशा गावात आजही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तंटामुक्त समित्या चालवित आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे अध्यक्ष असलेल्या समित्या पोलिसांच्या मदतीने खोटा अहवाल तयार करून गाव तंटामुक्त झाल्याचे भासवितात. हा देखील गंभीर विषय बनला आहे. काही गावांमध्ये ग्रामस्थांनी सरपंचांंविरोधातच तक्रारी दाखल केलेल्या आहेत़ तर काही तंटामुक्त समित्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे सदस्य काम करीत आहेत. एवढेच नव्हे तर या समित्यांमधीेल सदस्य नेमून दिलेल्या प्रवर्गामधीलही नसल्याचे आढळून आले आहे़ हा सारा प्रकार सुजाण नागरिकांना सहन होण्यापलिकडे आहे़ यावर वरताण करीत समित्यांचे अध्यक्षांच्या नावावर काही गुन्हे दाखल झाले असतानाच, हे अध्यक्ष या समितीचे काम सांभाळत असल्याने या तंटामुक्त समित्या असून नसल्यासारख्या झाल्या आहेत. काही अध्यक्षांच्या गुन्हयांच्या नोंदी पोलीसांकडे आहेत़ मात्र, या साऱ्या प्रकाराबद्दल मौन पाळले जात आहे़ पोलिसांसह प्रशासनातील कोणतीही यंत्रणा तंटामुक्त समित्यांची साधी चौकशी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ स्वहीत साधण्यापलीकडे पोलीस प्रशासन देखील काही करीत नसल्याचे समोर आले आहे. गाव तंटामुक्त होण्यासाठी पारदर्शक कारभाराची जेवढी आवश्यकता आहे, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गरज समित्यांमधील सदस्यांच्या निष्कलंक चारित्र्याची़ आवश्यक आहे. दोन चार लोकांना हाताशी घेऊन काढलेले फोटो आणि एखादा उपक्रम केल्याचे रंगविलेले कागद हीच तंटामुक्त गावाची संकल्पना आहे की काय असेच वरकरणी वाटते़ अनेक ठिकाणी राजकारणांशी संबंधित असलेले कार्यकर्ते या अध्यक्षस्थानावर चिकटून बसल्याने आणि गावातील गावपुढारी हेच असल्याने गावातील प्रामाणिक व सज्जन ग्रामस्थांना हे अध्यक्षपद भुषविणे अशक्य झाले आहे़ हेच पदसिध्द अध्यक्ष कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित असून, मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन इप्सित साध्य करण्यामध्ये हे पुढारी मशगूल असतात़ अशा गावपुढा-यांचा बंदोबस्त करण्याबाबत कोणी पुढाकार घेत नाहीत. काही गावामध्ये राजकारणातूनच वाडी-मोहल्यामध्ये दोन गट पडले आहेत़ (प्रतिनिधी)
यांची चौकशी कधी करणार...
तंटामुक्त समितीच्या स्थापनेमागची खरी भूमिका आज पहायला मिळत नसल्याच्या घटना पहायला मिळत ्आहेत. खेड तालुक्यातील बऱ्याचशा गावात तंटामुक्त समितीच्या स्थापनेबद्दल शंका व्यक्त होताना पहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील बऱ्याचशा गावात आजही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर ही जबाबदारी दिल्याने याबाबत नापसंती व्यक्त करण्यात येत असून, या साऱ्या पार्श्वभूमि असलेल्यांची चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे.