तिघा अधिकार्यांच्या केल्या बदल्या
By Admin | Updated: June 5, 2014 00:41 IST2014-06-05T00:41:14+5:302014-06-05T00:41:33+5:30
जिल्हा परिषद : तीन विभागांचा कार्यभार प्रभारींकडे

तिघा अधिकार्यांच्या केल्या बदल्या
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली आहे. त्यामुळे ही पदे रिक्त झाली असून, त्यांचा कारभार आता प्रभारी पाहात आहेत. रिक्त झालेली पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन खिळखिळे करण्याचा शासनाचा डाव आहे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल. एस. बागुल यांची दोन महिन्यांपूर्वीच जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर १ जून रोजी जळगावसाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी अनिलकुमार कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर झाली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्यांना त्यावेळी कार्यमुक्त न केल्याने ते मंगळवारपर्यंत जिल्हा परिषदेत कार्यरत होते. आता त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाने हिंगोली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली फिरवून घेतली. जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोज वेताळ यांची बदली मिरज येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी झाली आहे. या तिन्ही अधिकार्यांना प्रशासनाने नुकतेच कार्यमुक्त केले. जिल्हा कृषी विकास अधिकारी या पदावर पुणे येथील आयुक्त कार्यालयातील उपसंचालक पी. एन. देशमुख यांची बदली झाली आहे. ते अद्याप रुजू झालेले नाहीत. शिक्षणाधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अजून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पदांचा कार्यभार प्रभारींकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही प्रमुख पदे किती दिवस रिक्त राहणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)