वाहतूक पोलिसांची एकाच दिवशी ३३ जणांवर कारवाई
By Admin | Updated: November 25, 2015 00:32 IST2015-11-25T00:20:52+5:302015-11-25T00:32:55+5:30
चिपळूण शहर : वडापवाल्यांवरही उगारला बडगा

वाहतूक पोलिसांची एकाच दिवशी ३३ जणांवर कारवाई
चिपळूण : एस. टी. स्टॅण्ड परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याबाबत आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी आज (मंगळवारी) धडाकेबाज कारवाई करून ३३ जणांवर गुन्हे नोंदवले. त्यांच्याकडून ४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर दोन वडापवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठाच्या आदेशानुसार एस. टी. स्टॅण्डपासून २०० मीटरच्या आत बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करू नये, असे असताना चिपळूण एस. टी. स्टॅण्ड परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नात घट होते. एस. टी.चे प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करीत असल्याने एस. टी.चे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे, अशा बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी एस. टी. अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती.
वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी आपले सहकारी शांताराम साप्ते, गणपत झोरे, सुनील साळुंखे, रवींद्र शिंदे, सुभाष भुवड यांच्यासह एस. टी.चे आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांना बरोबर घेऊन कारवाई केली. एस. टी. स्टॅण्ड परिसरातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १६ वाहनांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर बाजारपेठेत विविध ठिकाणी १७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक पोलिसांनी आज धडक कारवाई केल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीबरोबरच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवरही नजीकच्या काळात कठोर कारवाई केली जाईल, असेही उपनिरीक्षक परदेशी यांनी सांगितले. सध्या चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. बाजारपेठेतील वाहतुकीचे नियमन झाले असले तरी बेकायदा प्रवासी वाहतुकीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)