वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:42+5:302021-07-02T04:21:42+5:30
दापोली : शहरात वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने तासनतास उभी करून ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. बाजारपेठेतून ...

वाहतूककोंडी
दापोली : शहरात वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने तासनतास उभी करून ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. बाजारपेठेतून जाताना तर नागरिकांना अडचणीचा सामना करत जावे लागते. अरुंद असलेल्या रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तेलदरात कपात
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती. मात्र आता तेलावरील आयात शुल्कात सरकारने कपात केली आहे. त्यामुळे पामतेलासह अन्य खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.
हरित सेनेचा उपक्रम
राजापूर : येथील राष्ट्रीय हरित सेना विभागातर्फे राजापूर हायस्कूलमधील शिक्षकांनी वेगळा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रारंभ कुंड्यांमधून उपयुक्त वनस्पती लावून करण्यात आला. हरित सेनेमार्फत शिक्षकांना प्रत्येकी एक कुंडी देण्यात आली आहे. यात शिक्षकांनी १ रोप वाढविण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
गावात जनजागृती
रत्नागिरी : तालुक्यातील भोके गावामध्ये ग्रामपंचायत आदर्श ग्रामसंघ आणि संकल्प ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली आयोजित करून लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यात आले. उपसरपंच मनस्वी जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रॅलीसाठी बचतगट आणि ग्रामसंघाच्या महिला प्रतिनिधी यांचा सहभाग होता.
पुल वाहतुकीसाठी खुला
रत्नागिरी : रत्नागिरी कोस्ट गार्डने विमानतळाचे काम हाती घेतल्यानंतर या परिसरातील रस्ता आणि पाण्याची पाइपलाइन मुंबई उपकेंद्रासमोरून वळविण्यात आली आहे. या ठिकाणचा पूलही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोस्ट गार्डने रस्ते आणि इमारती यांचे काम सुरू करण्यास प्रारंभ केला आहे.